बनावट सोने तारण ठेवून कॅनरा बँकेची 17 लाखांची फसवणूक; जामखेडमधील धक्कादायक घटना; चौघांना अटक
जामखेडमधील कॅनरा बँकेत बनावट सोने तारण ठेवून बँकेची 17 लाख 73 हजारांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी गोल्ड व्हॅल्युअरसह चारजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात तीनजणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आज पोलिसांनी महिलेआ अटक केली आहे. चारही आरोपींना आज न्यायालयात हजर केल्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी बँकेचा गोल्ड व्हॅल्युअर अण्णासाहेब कोल्हे, मुन्वर पठाण, दिगंबर आजबे व महिला अनिता जमदाडे यांनी संगनमत करून बँकेची 17 लाख 73 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.
कॅनरा बँकेत खातेदारांनी तारण ठेवलेले सोन्याच्या दागिन्यांची कॅनरा बँकेचे क्षेत्रीय कार्यालय (जि. नाशिक) यांच्यामार्फत गोल्ड व्हॅल्युअर जगन्नाथ रामदार सोनार यांनी 13 मार्च रोजी क्वॉलिटी तपासणी केली असता, खातेदारांनी बँकेत तारण ठेवलेले सोन्याचे दागिने बनावट असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. बनावट सोन्याचे दागिने ठेवून रोख रक्कम कर्ज म्हणून 17 लाख 73 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जामखेड येथील गोल्ड व्हॅल्युअरसह चारजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश असून, पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. आज पोलिसांनी अनिता संतोष जमदाडे हिला अटक केली आहे.
कॅनरा बँकेचे मॅनेजर आनंद बाबासाहेब डोळसे (वय 30, रा. शिक्षक कॉलनी, जामखेड) यांनी जामखेड पोलिसांत फिर्याद दिली. बँक शाखेत 3 सप्टेंबर 2018 पासून गोल्ड व्हॅल्युअर म्हणून अण्णासाहेब नामदेव कोल्हे (रा. शिवम ज्वेलर्स, बीड कॉर्नर जामखेड, जि. अहिल्यानगर) म्हणून कार्यरत आहेत. खातेदार मुनावर अजीम खान पठाण (रा. नुराणी कॉलनी, जामखेड) यांनी 21 ऑक्टोबर 2024 रोजी बँकेत सोन्याच्या 60 ग्रॅमच्या 4 बांगड्या व 4 नग सोन्याच्या अंगठ्या वजन 40 ग्रॅम असे एकूण 100 ग्रॅम सोने तारण म्हणून बँकेत ठेवले. ज्याची किंमत 5,84,375 असून, त्यांनी बँकेतून 4,55,000 कर्ज घेतले.
दुसऱ्या खातेदार महिला अनिता संतोष जमदाडे (रा. बाजारतळ, जामखेड, जि. अहिल्यानगर) यांनी 23 ऑक्टोबर 2024 रोजी बँकेत सोन्याच्या 2 नग बांगड्या वजन 53.500 ग्रॅमच्या व 5 नग अंगठ्या वजन 98.700 ग्रॅम बँकेत ठेवले. यावर त्यांनी बँक शाखेतून 6,70,000 रुपये उचलले. खातेदार दिगंबर उत्तम आजबे (रा. आजबे वाडा, मेन रोड, जामखेड, जि. अहिल्यानगर) यांनी 30 ऑक्टोबर 2024 रोजी 143.700 ग्रॅम सोने तारण ठेवून 6,48,000 घेतले. गोल्ड व्हॅल्युअर म्हणून जगन्नाथ रामदार सोनार यांनी क्वॉलिटी तपासणी केली असता, वरील खातेदारांनी बँकेत तारण ठेवलेले सोन्याचे दागिने बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List