“मला अशी पत्नी नको जी..”; अमिताभ बच्चन यांनी लग्नापूर्वी ठेवली होती ‘ही’ अट, जया यांच्याकडून खुलासा
अभिनेता अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला आता 50 वर्षांहून अधिक काळ उलटला आहे. या दोघांनी 3 जून 1973 रोजी लग्नगाठ बांधली. जया बच्चन यांच्या घरीच मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला होता. अमिताभ आणि जया यांची प्रेमकहाणी तर जगजाहीर आहे. परंतु लग्नाआधी बिग बींनी जया यांच्यासमोर एक अट ठेवल्याचं फार क्वचित लोकांना माहीत असेल. याबद्दलचा खुलासा खुद्द जया यांनी नात नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्ट मुलाखतीत केला होता.
लग्नानंतर आपल्या पत्नीने पूर्ण वेळ काम करू नये, याबाबत अमिताभ बच्चन ठाम होते. ‘व्हॉट द हेल नव्या’ या नातीच्या पॉडकास्टमध्ये जया म्हणाल्या, “आम्ही ऑक्टोबरमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. कारण तोपर्यंत माझ्या हातातील काम कमी होणार होतं. पण त्यांनी मला आधीच सांगितलं होतं की मला 9 ते 5 वेळेत काम करणारी पत्नी नकोय. तू काम कर, पण दररोज करू नकोस. तू तुझे प्रोजेक्ट्स आणि काम योग्य लोकांसोबत निवड, असं ते म्हणाले होते.”
जया आणि अमिताभ बच्चन यांची पहिली भेट 1971 मध्ये ऋषिकेश मुखर्जी यांच्या ‘गुड्डी’ या चित्रपटादरम्यान झाली. त्यानंतर या दोघांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. ‘जंजीर’, ‘अभिमान’, ‘चुपके चुपके’, ‘शोले’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘सिलसिला’ यांसारख्या चित्रपटांमध्ये ही लोकप्रिय जोडी एकत्र झळकली. पहिल्या भेटीच्या दोन वर्षांनंतर 3 जून 1973 रोजी जया आणि बिग बींनी लग्न केलं.
जया बच्चन यांच्याशी लग्नानंतर अमिताभ बच्चन बॉलिवूड इंडस्ट्रीत सुपरस्टार झाले. तर दुसरीकडे जया यांनी निवडक चित्रपट करण्यावर भर दिला. त्यांनी त्यांचा पूर्ण वेळ कुटुंबाला देण्यास प्राधान्य दिलं. श्वेता बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या जन्मानंतर जया यांनी कामातून मोठा ब्रेक घेतला. त्यांची मुलगी श्वेता बच्चनने निखिल नंदाशी लग्न केलं. निखिल नंदा हा करीना, करिश्मा आणि रणबीर कपूर यांचा चुलत भाऊ आहे. तर मुलगा अभिषेकने ऐश्वर्या रायशी लग्न केलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List