“तर बाप म्हणून मी माझ्या मुलीचे पाय तोडले असते…”; संजय दत्त असं का म्हणाला ?
बॉलिवूडमधील असे अनेक कलाकार आहे ज्यांच्या मुलंही आता अभिनय क्षेत्रात आपलं नशीब आजमावत आहेत. त्यात शाहरुख खान पासून ते सैफ अली खानपर्यंत सर्वांचीच मुलं आता बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर आपली एक वेगळी ओळख बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण बॉलिवूडमध्ये असा एक अभिनेता आहे जो सुपरस्टार असून त्याने 90 च्या दशकापासून बॉलिवूडवर आपली वेगळी छाप पाडली आहे. पण त्याच्या मुलांनी अभिनय क्षेत्रात येणं पसंत नाही.
संजयने ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन मुलीबद्दल दिली प्रतिक्रिया
हा अभिनेता आहे संजय दत्त. ज्याने आपल्या स्टाइलने आज बॉलिवूड गाजवलं आहे. मुन्नाभाई म्हणून ज्याने लोकांच्या मनावर राज्य केलं त्याला मात्र त्यांच्या मुलांसाठी बॉलिवूड हा करिअर ऑप्शन अजिबात मान्य नाही. सध्या संजय दत्त ‘ भूमी’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्याच्या या चित्रपटाबद्दल चाहत्यामध्ये मोठी उत्सुकता असून आग्रा येथे झालेले शूटिंग पहायला मोठी गर्दीही झाली होती. या चित्रपटासंबंधी एका पत्रकार परिषदेचं दिल्लीत आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी संजयने चित्रपटासंबंधित तसेच त्याच्या ऑनस्क्रिन मुलीबद्दल म्हणजेच अदिती राव हैदरीबद्दल अनेक प्रश्नांचीही उत्तरे दिली.
“तर…मी माझ्या मुलीचे पाय तोडले असते”
दरम्यान याचवेळी त्याला त्याची खरी मुलगी त्रिशला बद्दलही प्रश्न विचारण्यात आले. त्रिशला आणि आदिती मध्ये काय साम्य आहे असं त्याला विचारण्यात आलं तेव्हा संजय दत्त म्हणाला ‘ जर त्रिशालाने अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला असता तर मी तिचे पायच तोडले असते. पण, आदितीसोबत म्हणजेच माझ्या ऑनस्क्रिन मुलीसोबत मी असं काहीही करणार नाही.’ त्याच्या या उत्तरामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं.
“मला आनंद आहे की माझ्या मुलीच्या डोक्यातून ते भूत गेलं”
आपल्या मुलांनी आपला अभिनयाचा वारसा पुढे चालवावा असं प्रत्येकाला वाटते, मात्र संजयला तसं वाटत नसल्याचं आणि त्याला ते आवडतही नसल्याचं त्याच्या उत्तरावरून स्पष्ट झालं. तसेच तो पुढे म्हणाला होता की “मला आनंद आहे की सध्या तरी माझ्या मुलीच्या मनातून अभिनयाचे भूत निघून गेलं आहे. निदान सध्या तरी तिने अभिनयाचा छंद सोडून दिला आहे. ती इतकी हुशार मुलगी आहे की तिने फॉरेन्सिक सायन्सचा अभ्यास केला आहे”
मुलीच्या प्रेमाविषयी समजलं तर…
संजय दत्तची दोन लग्न झाली असून त्याची दुसरी पत्नी मान्यता दत्तपासून दोन मुले आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी. संजय त्या दोघांबद्दल खूप प्रोटेक्टीव आहे. अनेकदा त्याने हे सांगितले आहे की तो त्याची मुलगी त्रिशालाशी खूप कडक वागतो. एवढंच नाही तर त्याच्या मुलीने कोणाशी डेटिंग केलं तर त्यावेळी त्याची भूमिक कशी असेल याबद्दलही त्याने प्रतिक्रिया दिली होती.
संजय दत्त म्हणाला होता की जर त्याची मुले त्याच्याकडे आली आणि त्याला सांगितलं की ते प्रेमात आहेत तर संजय दत्त म्हणाला “जर माझा मुलगा येऊन म्हणाला की तो प्रेमात आहे तर ते ठीक आहे पण जर माझी मुलगी येऊन म्हणाली की ती कोणाच्या प्रेमात आहे किंवा ती कोणाला तरी डेटींग करतेय तर ते देखील ठीक आहे पण मला माहित असायला हवं की तो कोण आहे? आणि काय करते वैगरे”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List