ठाणे महापालिकेची स्वस्त घरे एकनाथ शिंदेंच्या घरगड्यांना, 7 जण लाभार्थी… रस्ता रुंदीकरणात बाधित असल्याचे दाखवत ताबाही दिला
महापालिकेची परवडणारी स्वस्त घरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरगड्यांना वाटप करण्यात आली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामध्ये 7 जण लाभार्थी असून रस्ता रुंदीकरणात बाधित असल्याचे दाखवत खोटी कागदपत्रे तयार करून घरांचा ताबाही त्यांना देण्यात आला आहे. दरम्यान, एकीकडे विविध प्रकल्पांत बाधित झालेले नागरिक हक्काच्या घरासाठी पालिकेच्या दारात खेटे मारत असताना दुसरीकडे त्यांच्याच घरामध्ये मिंध्यांनी आपले घरगडी घुसवल्याने घरे न मिळालेल्या खऱया प्रकल्पग्रस्तांत संतापाची लाट उसळली आहे.
ठाण्यातील उपवन परिसरात असलेल्या निळकंठ प्रकल्पात महापालिकेला विकासकाच्या मार्फत 30 सदनिका प्राप्त झाल्या आहेत. या सदनिकांमध्ये रस्ता रुंदीकरण किंवा प्रकल्प बाधितांना घरे देण्याचे प्रशासनाने निश्चित केले. मात्र ही घरे बाधितांना न देता मिंध्यांच्या घरामध्ये काम करणाऱया कर्मचाऱयांना देण्यात आली असल्याने पालिका अधिकाऱयांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे घरे देण्याची मंजुरी नसताना घराच्या चाव्यादेखील या सर्व कर्मचाऱयांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पालिकेच्या कारभारावर सर्व स्तरांतून टीकेची झोड उठली आहे.
प्रकल्पबाधित उठाव करण्याच्या तयारीत
निळकंठ प्रकल्पातील ही घरे शास्त्राrनगर येथील रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या नागरिकांसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तत्कालीन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात या ठिकाणी रस्ता रुंदीकरणाची मोहीम राबवण्यात आली होती. मात्र त्यांच्या हक्काची घरे परस्पर हडपली असल्याने बाधित नागरिक उठाव करण्याच्या तयारीत आहेत.
प्रकल्पबाधित दाखवून खोटी कागदपत्रे
ठाणे पालिका अधिकाऱ्यांना बोलावून घरात काम करणाऱयांना ही घरे देण्यात यावीत, असे फर्मान काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या फर्मानानंतर अत्यंत लगबगीत अधिकाऱयांनी 7 लाभार्थ्यांना कोपरीमधील प्रकल्पबाधित दाखवले. त्यांची खोटी कागदपत्रे तयार करून घरांच्या चाव्याही देण्यात आल्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List