अजितदादा, तुमचा एक आमदार राज्य नासवतोय! वैभवी देशमुखला अश्रू अनावर
अजित पवारांना माझी विनंती आहे… माझे वडील गेलेत, आम्ही न्याय मागतो आहोत. आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या. या प्रकरणाची खोलवर जाऊन चौकशी करा. तुमच्या पक्षातील एक आमदार हे राज्य नासवतोय. त्याला तुम्ही पाठीशी घालू नका, अशा शब्दांत संतोष देशमुख यांची लेक वैभवीने आज धनंजय मुंडे यांचा नामोल्लेख टाळत संताप व्यक्त केला. खंडणीचे पैसे कोणाला पोचवले जातात, माझ्या वडिलांचा गुन्हा काय होता, असा सवालही तिने केला. बारामतीतील सर्वधर्मीय आक्रोश मोर्चात वैभवीला अश्रू अनावर झाले. मात्र त्याही स्थितीत तिने बीडमधील भीषण वास्तव लोकांसमोर मांडले.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिने पूर्ण झाले आहेत. अजूनही कृष्णा आंधळे हा आरोपी फरार असून न्यायासाठी देशमुख कुटुंबीय आक्रोश करत आहे. आज बारामतीत कडकडीत बंद पाळून सर्वधर्मीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला देशमुख कुटुंबीय उपस्थित होते. वडिलांच्या हत्या प्रकरणात सर्वांनीच हात दिल्याने न्यायाचा लढा पुढे आला. आता आपल्याला बीड जिह्यातील घाण काढून टाकायची आहे, असे यावेळी वैभवी देशमुख म्हणाली. दलित बांधवाला वाचविण्यासाठी गेलेल्या माझ्या वडिलांना एवढी क्रूर शिक्षा दिली गेली. अशाने कोणीच दुसऱयासाठी पुढे येणार नाही. वडिलांच्या मृत्यूला दोषी असलेल्यांना शिक्षा मिळाली नाही तर रस्त्याने जाताना धक्का लागला तरी खून होईल, अशी भीती तिने व्यक्त केली. माझ्या वडिलांची हत्या खंडणीतून झाली. खंडणी कोणासाठी जात होती, असा सवाल तिने केला.
पोलिसांनी वेळीच दखल न घेतल्याने हे घडल्याचा आरोप देशमुख यांचे बंधू धनंजय यांनी केला. देशमुख यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी केली आहे. 28 मे 2024 रोजी अवादा कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकाऱयांचे अपहरण झाले. कंपनीने 29 तारखेला एफआयआर दाखल केला. दोघांनी अपहरण केले होते. मात्र त्यात एकाच व्यक्तीचे नाव आहे. त्याचा तपास झाला नाही. आरोपींना कळून चुकले, आपले काहीही होत नाही. त्यानंतर सूत्रधार वाल्मीक कराड याच्या सूचनेवरून 29 नोव्हेंबरला खंडणीची मागणी झाली. त्याबाबतही गुन्हा दाखल झाला नाही. त्याच वेळी गुन्हे दाखल झाले असते तर या घटना घडल्याच नसत्या, असा आरोप देशमुख यांनी केला.
6 डिसेंबरला हे आठ जण कंपनीत आले. एका दलित बांधवाला अमानुषपणे मारण्यास सुरुवात केली. तो ंकचाळत, मार खात होता. म्हणून गावातील एका व्यक्तीने संतोष आण्णांना फोन केला. तो सोडवायला गेला. पण, त्यालाही मारहाण झाली. गावातील लोकांशी दोन हात झाले. त्याविरोधात अशोक सोनवणे हा दलित बांधव पोलीस ठाण्यात बसून तक्रार देण्यासाठी भीक मागत होता. परंतु राजकीय पाठबळ असल्याने त्याची एफआयआर घेतली नाही. ती अॅट्रॉसिटी घेतली असती तर गुन्हा घडला नसता, असे देशमुख यांनी सांगितले.
धनंजय देशमुखांचा देहदानाचा निर्णय
संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांना मारहाण होत असतानाचे फोटो समोर आले होते. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे अधिवेशन सुरू झाल्यावर धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तरीही देशमुख परिवार न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. तर आज रविवारी स्व. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आज रविवारी देहदान करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मी माझ्या जन्मदिनाच्या दिवशी देहदानाचा संकल्प केला आहे. त्यांचा अर्ज अंबाजोगाई येथील उपजिल्हा रुग्णालय येथे भरून दिला आहे. माझ्या भावाचा लढा आहे. त्यासाठी मी हा संकल्प केला असून, माझ्या भावासाठी मी न्याय मिळवण्यासाठी लढणार आहे आणि एवढेच नाही तर या दृष्ट प्रवृत्ती हटवण्यासाठी लढणार असल्याचे ते म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List