‘बिग बॉस’च्या या विजेत्याला अद्याप मिळाले नाहीत बक्षिसाचे 50 लाख रुपये; म्हणाला..
प्रसिद्ध टीव्ही अभिनेता करणवीर मेहराने काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस 18’चं विजेतेपद पटकावलं. ग्रँड फिनालेमध्ये करणवीरला 50 लाख रुपये बक्षिसाची रक्कम मिळणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र आता कॉमेडियन भारती सिंहच्या पॉडकास्टमध्ये करणवीरने बक्षिसाच्या रकमेबाबत मोठा खुलासा केला आहे. अजूनपर्यंत त्याला ही रक्कम मिळालीच नाही, असं त्याने स्पष्ट केलंय. ‘बिग बॉस 18’च्या आधी करणवीरने ‘खतरों के खिलाडी 14’चं विजेतेपद पटकावलं होतं. तो शो जिंकल्यानंतर बक्षिसाची रक्कम मिळाल्याचंही त्याने सांगितलं. त्याचसोबत जी कार त्याला मिळणार होती, ती काही दिवसांत त्याला दिली जाणार असल्याचा खुलासा त्याने केला.
‘खतरों के खिलाडी’बद्दल बोलताना करणवीर म्हणाला, “खतरों के खिलाडी 14 हा माझा कलर्स टीव्हीसोबतचा पहिला शो होता. आता या चॅनलला सोडण्याचा माझा कोणताही हेतू नाही. कलर्समुळे तुमची एक ओळख निर्माण होते. बिग बॉस 18 जिंकल्यानंतर मला 50 लाख रुपये बक्षीस मिळणार होते. ते पैसे अजून मला मिळाले नाहीत. परंतु खतरों के खिलाडी 14 चे पैसे मला मिळाले आहेत. त्याचप्रमाणे शोमध्ये मी जी कार जिंकली होती, ती काही दिवसांतच मला मिळणार आहे. मला याआधी वेळ मिळाला नव्हता, त्यामुळे मी आता बुक केली.”
‘बिग बॉस 18’चा विजय हा स्क्रिप्टेड होता का, असा प्रश्न विचारल्यावर करणवीर पुढे म्हणाला, “हा सर्व देवाचा प्लॅन होता. प्रत्येकाने माझ्या विजयात काही ना काही योगदान दिलंय. मला बिग बॉसच्या घरात मजा येत होती आणि मी जिंकण्याबद्दल अजिबात विचार करत नव्हतो. आठवड्याला मला किती मानधन मिळणार हे ठरलेलं होतं. त्यामुळे जिंकणं किंवा हरणं याने मला फरक पडत नव्हता. तो व्यक्तिमत्त्वाचा खेळ होता आणि माझं व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांना आवडलं. जरी मी दुसऱ्या स्थानी राहिलो असतो तरी मी काही वेगळा वागलो नसतो. पण मी जिंकेन असं मला वाटत होतं. बिग बॉस संपल्यानंतर मला जे प्रेम मिळतंय, ते भारावणारं आहे. मी चाहत्यांसोबत खूप वेळ घालवतोय.”
“माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता की माझी आई हा शो पाहतेय. त्यामुळे शोमध्ये मी कधीच शिवीगाळ किंवा मारहाण केली नाही. मी निर्मात्यांनाही हेच सांगितलं होतं की मी शांतपणे ट्रॉफी माझ्या नावे करेन आणि त्यासाठी विनाकारण काहीच करणार नाही. बिग बॉस हा शो वेगळ्या कारणांमुळे ओळखला जातो. पण शोची सफाई केल्याबद्दल माझं कौतुक होतंय. आता अनेक अभिनेत्यांना या शोमध्ये यायचंय. माझ्यासाठी हा प्रवास खूप उशिरा सुरू झाला पण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं”, अशा शब्दांत करणवीरने भावना व्यक्त केल्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List