पालिका कामाला लागली… ‘आयआयटी’कडून मध्यरात्री दर्जा तपासणी; मुंबईत 701 काँक्रिटीकरण रस्त्यांची कामे प्रगतिपथावर
मुंबईत पालिकेच्या माध्यमातून सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्यांची पहिल्या टप्प्याची 392 आणि दुसऱ्या टप्प्याची 309 कामे हाती घेण्यात आली आहेत. ही कामे दर्जेदार व्हावीत यासाठी थर्ड पार्टी ऑडिट सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर काल मध्यरात्री काँक्रिटीकरण कामाची पाहणी आयआयटीकडून करण्यात आली. यावेळी आयआयटी तज्ञांनी दर्जेदार कामासाठी कंत्राटदारांना मार्गदर्शनही केले.
मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत सुमारे अडीच हजार किमीचे रस्ते आहेत. या रस्त्यांवर वारंवार पडणाऱ्या खड्डय़ांमुळे पालिकेला मोठय़ा टीकेचा सामना करावा लागत असल्यामुळे सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याचे धोरण पालिकेने आखले आहे. यानुसार 701 किलोमीटर रस्ते काँक्रिटीकरणासाठी कामे हाती घेण्यात आली आहेत. सिमेंट काँक्रिटीकरण कामाचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहावी यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था यांची गुणवत्ता नियंत्रणासाठी त्रयस्थ संस्था (थर्ड पार्टी) म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला आहे. यानुसार यावेळी आयआयटी टीमने कंत्राटदारांना काँक्रिटीकरण सुरू असताना घ्यावयाच्या चाचण्या व प्रत्यक्ष हवामानातील बदल आणि तापमानानुसार प्रत्यक्षस्थळी करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच काँक्रिटीकरण झाल्यानंतर करावयाच्या उपाययोजना, काँक्रिट ग्रुव्ह कटिंगची काटेकोर अंमलबजावणी 8 ते 12 तासांमध्ये करण्याबाबतच्या सूचनाही त्यांनी केल्या. तसेच काँक्रिटीकरण चालू असताना हवेतील आर्द्रता व वाऱयाची दिशा, वाऱयाचा वेग याचा अभ्यास करण्यासाठी मोबाईल ऍपचा सुयोग्य वापराबाबत आयआयटीने मार्गदर्शन केले.
असे होणार थर्ड पार्टी ऑडिट
आयआयटीकडून रस्त्यांच्या देखभाल, पुनर्रचना व पुनर्वसनासाठी योग्य पद्धती निश्चित करण्यासाठी आवश्यक सल्ला देणे, प्रत्येक प्रकरणाच्या आधारे आवश्यकतेनुसार तपासणी करणे, गुणवत्ता तपासणीचे निकष प्रत्येक प्रकरणाच्या आवश्यकतेनुसार तपासणे, गुणवत्ता आश्वासनासाठी चाचण्या घेणे आणि गुणवत्ता नियंत्रण चाचणी अहवालांची तपासणी करणे, तांत्रिक लेखापरीक्षण अहवाल तयार करणे, गुणवत्तेची खात्री करण्यासाठी नियमितपणे प्रकल्पस्थळास भेटी देणे अशी कामे केली जाणार आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List