रेणापूरमध्ये भव्य आक्रोश मोर्चा, संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवार, 27 डिसेंबर रोजी रेणापूर येथील श्रीराम विद्यालय ते रेणापूर तहसील कार्यालयावर रेणापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख आणि मुलगा विराज देशमुख यांच्या उपस्थितीत भव्य असा आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
बीड जिह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण करून त्यांचा निर्घृण खून करण्यात आला. त्याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. या प्रकरणामुळे राज्यात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. राज्यातील मराठा समाज पेटून उठला आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे, गुन्हेगाराला फाशी झाली पाहिजे यासह अनेक मागण्यांसाठी रेणापूर येथील श्रीराम विद्यालयापासून तहसील कार्यालयापर्यंत भव्य असा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये महिलांचाही लक्षणीय सहभाग होता. प्रत्येकांच्या हातात भगवे झेंडे, मागण्यांचे व निषेधाचे फलक होते. प्रत्येकाने काळ्याफिती बांधून निषेधाच्या घोषणा आणि ‘अमर रहे अमर रहे संतोष देशमुख अमर रहे’, गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या मुंडे भाऊ बहिणींचा मंत्री पदाचा राजीनामा घ्या, गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, मुख्य सुत्रधारांना अटक करा, अशा घोषणांनी मोर्चा दणाणून गेला होता.
मोर्चा रेणापूर तहसील कार्यालयासमोर पोहचताच पुन्हा एकदा घोषणांनी मार्च दणाणून गेला होता. यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी आणि मुलगा विराज देशमुख यांच्या हस्ते रेणापूरच्या तहसीलदार मंजूषा भगत यांच्याकडे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या वाल्मीक कराड यांच्यासह सर्व आरोपींना तात्काळ अटक करा, हे प्रकरण फास्टट्रक कोर्टात चालवून आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, मस्साजोग गावासह पीडित कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्यात येऊन संतोष देशमुख यांच्या घरातील एका व्यक्तीचा शासकीय सेवेत समावेश करावा. बीड जिह्यातील गुंडशाहीला पाठबळ देणाऱ्या मंत्री धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांचा मंत्री पदाचा राजीनामा मुख्यमंत्री यांनी घ्यावा, संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर कारवाई करण्यास जाणीवपूर्वक विलंब करून टाळाटाळ करणाऱ्या पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना सहआरोपी करून सेवेतून बडतर्फ करावे, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
आरोपींना लवकर अटक झाली पाहिजे; वैभवी देशमुखचे भावुक आवाहन
मोर्चात वैभवी देशमुख हिला रडू आवरत नव्हते. यावेळी तिने सांगितले की, आज दुःखाचा प्रसंग आहे. तुम्ही सर्वजण आमच्या पाठीशी उभे राहिलात, असेच तुम्ही कायम आमच्या पाठीशी उभे रहावेत, अशी विनंती केली. माझ्या वडिलांची क्रूरपणे हत्या करण्यात आली असून आमचे छत्र हिरावून घेतले. आज आमच्या कुटुंबावर जी वेळ आली ती कुठल्याही कुटुंबावर, मुला-मुलींवर येऊ नये. माझे वडील समाजसेवक होते. समाजासाठीच त्यांनी सर्व काही केले, आमच्यासाठी काहीच केले नाही. गावामध्ये स्वच्छता अभियानासह अनेक कामे केली. दारूच्या आहारी गेलेल्यांना व्यसनातून मुक्त केले. ग्रामपंचायतीला अनेक पुरस्कार मिळाले. तुम्हा सर्वांना मी माझ्या परिवाराचा हिस्सा मानते. आता आलात तसे प्रत्येक मोर्चात सहभागी होऊन माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या. जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे असे वैभवी देशमुख म्हणाल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List