संतोष देशमुख हत्या प्रकरणी कोणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय का, मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं – अमोल कोल्हे
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज 20 दिवस झालेत. तरी अजूनही काही आरोपींना अटक अटक करण्यात पोलिसांना यश आलं नाही. यातच संतोष देशमुख हत्या प्रकरणी कोणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय का? याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर द्यावं, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले आहेत. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.
या प्रकरणी सातत्याने विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं जात आहे. यावरच बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, ”वैयक्तिक मला कोणावरही टीका करायची नाही. मात्र सरकारमधील एखाद्या मंत्रिसंदर्भात सातत्याने असे आरोप होत असतील, तसेच त्या संशयाचं धुकं क्लिअर होत नसेल, तर एकूणच सरकारच्या कार्यप्रणाली आणि सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं. त्यामुळे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळायलाच हवा. या प्रकरणाच्या तपासाची चक्र वेगाने फिरायला हवीत. यात जे कोणीही आरोपी असतील, त्यांना शिक्षा व्हायला हवी.”
कोल्हे म्हणाले, ”यामध्ये कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न होऊ नये, ही सर्वसामान्यांची मागणी आहे. आज बीडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जो मोर्चा निघाला, यातूनच हेच सिद्ध होतं की, सर्वसामान्य जनता जागरूक आहे. कोणाच्या राजकीय आश्रयापोटी आणि आशिर्वादापोटी जर कोणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतं असेल, तर आता जनता ते सहन करण्याच्या मानसिकतेत नाही.”
ते पुढे म्हणाले की, ”संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी इतके दिवस जर लागत असतील, तर कोणीतरी पाठीशी घातल्याशिवाय असं होऊ शकतं का? असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. हे संशयाचं जे वातावरण आहे, ते मुख्यमंत्र्यांनी दूर करायला हवं.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List