त्याला वाल्मिकी म्हणू नका, तो तर रक्तपिपासू वाल्या; जितेंद्र आव्हाड धनंजय मुंडेवर संतापले
राज्यात बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन वातावरण तापलं आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्या अटकेच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यात शनिवारी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या घटनेचा मुख्य सुत्रधाराला अटक करावा, अशी मागणी मोर्चेकरांनी केली आहे. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेद्र आव्हाड यांच्यासह बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते आमदार, खासदार सहभागी झाले आहेत. यावेळी सर्वपक्षीयांनी मंत्री धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
तो वाल्मिक नसून रक्तपिपासून वाल्या आहे. त्याने 20 खून केल्याचे त्यांनी म्हटले आहे. यांच्यासारख्यामुळे आमची जात बदनाम होते, असेही आव्हाड म्हणाले. बीडमधील घटनेच्या तपासाबाबत ते म्हणाले की, सीआयडी तपास करु देत किंवा आणखी कोणी, तपास यंत्रणा, पोलीस काही वरतून येत नाहीत. शेवटी वरती असतं ते सरकार, सरकार जसा आदेश देतं तसं पोलीस यंत्रणा काम करते हे गेल्या काही वर्षात सिद्ध झालं आहे. या हत्येमागचा मुख्य सुत्रधार धनंजय मुंडे आहे, मी विधानसभेत आणि बाहेरही तेच सांगितलं आहे. धनंजय मुंडेंनी खून केलाय असं मी म्हणत नाही. पण, वाल्किक कराडचा बाप तो आहे, तो स्वत: खून झाल्यानंतरही सांगतोय की, वाल्मिक कराड माझ्या जवळचा आहे. येथील विष्णू चाटे, घुले, हे कुणाची माणसं आहेत. यांच्याकडे इम्पोर्टेड गाड्या, जमिनी, रिव्हॉल्वर हे सगळं कुठून आलं, असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
बीडमध्ये अर्ध्याहून अधिक खून वंजाऱ्यांचेच झाले आहेत आणि तेही यांनीच केले आहेत. वाल्मिक कराड हा नरभक्षक वाघ कसा असतो, तसा नरभक्षक वाल्मिकी आहे. खरं तर वाल्मिकी कोणीही म्हणू नका, तो वाल्या आहे, या वाल्याला कधी पकडणार हे पोलिसांनी सांगायला हवं, वाल्मिक कराड हा आधुनिक वाल्या रक्तपिपासू आहे, आत्तापर्यंत 20 वंजारा समाजाचे खून त्याने केले आहेत. आमची जात यांच्यामुळे बदनाम होते आहे, धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढा, अशी पहिली मागणी मी केली होती, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर हल्ला चढवला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List