शिवसेनेने दणका देताच… नळजोडणीसाठी घेतलेले पैसे परत !
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दणका देताच जयभवानीनगरात नळ जोडणीसाठी कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांकडून घेतलेले साडेचार हजार रुपये परत केले, अशी माहिती महानगरप्रमुख राजू वैद्य यांनी दिली.
जयभवानीनगरमध्ये नवीन पाईपलाईन टाकण्यात येत आहे. पाईपलाईन टाकल्यानंतर कंत्राटदाराचे कर्मचारी हे नवीन नळकनेक्शन देण्यासाठी साडेचार हजार रुपयांची मागणी करतात. जयभवानीनगरमधील गल्ली नंबर एकमधील ज्या नागरिकांकडून पैसे घेतले त्यामध्ये कांचन तायडे, फकीरचंद लोंढे, भगवान कोळगे या व्यक्तींकडून प्रत्येकी साडेचार हजार रुपये यांनी घेतले.
उर्वरित नागरिकांना पैशांची मागणी केली होती. काही महिला घरी होत्या, त्यांनी सांगितले आमच्या घरचे आल्यानंतर पैसे देतो. त्यानंतर शिवसेनेचे उपविभागप्रमुख भागवत भारती यांच्यासह नागरिकांनी मोबाईलवरून शिवसेना महानगरप्रमुख राजू वैद्य यांना सांगितले की, नळ जोडणीसाठी पैसे मागितले असून, आम्ही तीन-चार जणांनी पैसे दिले. पैसे घेतल्याशिवाय नळकनेक्शन देणार नाही. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन राजू वैद्य यांनी तातडीने मनपा प्रशासक तथा आयुक्त जी. श्रीकांत यांना ही माहिती दिली. प्रशासकांनी या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना तातडीने चौकशीसाठी जयभवानीनगरात जाण्याचे आदेश दिले. त्यानुसार आज शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी सोनवणे, महेश फड हे जयभवानीनगरात दाखल झाले. त्यांनी नागरिकांकडे शहानिशा केली, यावेळी शिवसेनेचे भागवत भारती यांनी अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला बोलावून नळ जोडणीसाठी घेतलेले पैसे परत करायला सांगितले. कंत्राटदाराने भगवान कोळगे यांच्याकडून घेतलेले साडेचार हजार रुपये परत केले. उर्वरित दोघांचे पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्यामुळेच नागरिकांना पैसे परत मिळाले. यापुढे नळजोडणीसाठी पैसे मागितल्यास शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संपर्क करावा, असे आवाहन महानगरप्रमुख राजू वैद्य यांनी केले.
पैसे मागितल्यास जीव्हीपीआर कंपनीकडे तक्रार करा
सरकारच्या नवीन पाणीपुरवठा योजनेतंर्गत जीव्हीपीआर कंत्राटदार कंपनीतर्फे विनामूल्य नळकनेक्शन देण्यात येत आहे. या कंपनीच्या कोणताही कर्मचारी किंवा गुत्तेदारांनी नळकनेक्शन देण्यासाठी कसल्याही प्रकारे पैशांची मागणी केल्यास तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जीव्हीपीआर कंपनीने केले आहे. मनपाचे कार्यकारी अभियंता के. एम. फालक (९७६४९९९५५१), मजीप्राचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी (९०९६९२१२५८), मजीप्राचे उपविभागीय अधिकारी प्रदीप चारभे (९४२३५२९४६८), तसेच जीव्हीपीआर कंपनीचे प्रतिनिधी विशाल एडके (७७७००११०६५) यांच्याशी त्वरित संपर्क साधून माहिती द्यावी. जर एखाद्याने पैसे दिल्यास त्याची जबाबदारी कंपनीवर राहणार नाही, असे कंपनीचे महाव्यवस्थापक महेंद्र गुगुलोथू यांनी कळविले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List