नवी मुंबई पोलिसांना घरी बसून पगार, घोटाळ्याचा भंडाफोड करणाऱ्यांचा शोध सुरू
नवी मुंबईतील पोलिसांनी घरी बसून पगार घेतल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. या घोटाळ्याचा भंडाफोड कोणी केला, याचा शोध अधिकाऱ्यांनी सुरू केला असून अनेक प्रामाणिक कर्मचाऱ्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला आहे. दैनिक ‘सामना’ने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर घरी बसून पगार घेणाऱ्या पोलिसांची पळापळ उडाली आहे.
नवी मुंबई पोलीस दलातील काही कर्मचारी कामावर न जाता केवळ कागदावर ड्युटी करतात. ड्युटीच्या वेळेत प्रत्यक्षात मात्र ते घरी असतात किंवा या वेळेत खासगी कामे करीत असतात. केवळ कागदावर ड्युटी करीत घरी बसून पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढतो. अनेक वेळा कर्तव्यदक्ष कर्मचारी यासंदर्भात वरिष्ठांकडे दाद मागतात, परंतु आता त्याची दाद मागणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलीस दलातील गौडबंगाल चव्हाट्यावर आणल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करून त्यांना गप्प बसविण्याचा हा संतापजनक प्रकार असल्याची प्रतिक्रिया तक्रारदार अॅड. काशिनाथ ठाकूर यांनी दिली आहे.
अधिकाऱ्यांची चौकशी करा
नवी मुंबई पोलीस दलाला जर स्वतःची छबी सुधारायची असेल तर त्यांनी हा घोटाळा उघडकीस कोणी आणला हे जाणून घेण्यापेक्षा व्हीआयपी कर्मचारी कोण आहेत, घरी बसून पगार कोण कोण घेत आहेत याची माहिती घ्यावी. त्याचप्रमाणे सर्व सहा कंपनीचे जनरल ड्युटी अंमलदार व राखीव पोलीस निरीक्षक मुख्यालय नवी मुंबई यांची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी करीत अॅड. काशिनाथ ठाकूर यांनी केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List