उपचार नाकारणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांच्या सवलती काढून घेणार
>> राजेश चुरी
अनामत रकमेअभावी धर्मादाय रुग्णालयांना कोणत्याही रुग्णावर यापुढे उपचार नाकारता येणार नाहीत. रुग्णास त्वरित उपचारांसाठी दाखल करून घ्यावे लागेल. रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठीचे तातडीचे उपचार आणि वैद्यकीय सुविधा पुरवणे बंधनकारक केले आहे. एखाद्या धर्मादाय रुग्णालयाने कोणत्याही रुग्णावर उपचार नाकारले तर संबंधित रुग्णालयाच्या सवलती आणि फायदे काढून घेण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गरोदर महिलेवर उपचार नाकारल्याच्या घटनेनंतर राज्यातील धर्मादाय रुग्णालयांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या कामकाजाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आढावा घेऊन अनेक कठोर निर्णय घेतले. या निर्णयांची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.
महाराष्ट्रात 459 धर्मादाय रुग्णालये आहेत. त्यापैकी मुंबई व उपनगरात 80 धर्मादाय रुग्णालये आहेत. यापुढे प्रत्येक धर्मादाय रुग्णालयाच्या बाहेर ‘हे धर्मादाय रुग्णालय आहे ’ असा फलक लावणे बंधनकारक केले आहे.
धर्मादाय रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाला आवश्यकता वाटल्यास पुढील उपचारांसाठी सार्वजनिक रुग्णालयात नेण्यासाठी वाहतुकीची सुविधा पुरवावी.
अचानक रुग्णालयांना भेटी देणार
राज्याच्या विधि व न्याय विभागाने जारी केलेल्या यासंदर्भातील सर्व आदेशांची अंमलबजावणी करणे प्रत्येक धर्मादाय रुग्णालयांना बंधनकारक आहे. त्यावर देखरेख ठेवण्यासाठी विधी व न्याय विभागाने तपासणी समिती स्थापन केली आहे. या समितीचे पथक अचानक धर्मादाय रुग्णालयाला भेट देऊन योजनेच्या अंमलबजावणीबाबत तपासणी करील.
डिपॉझिट नसले तरी उपचार
धर्मादाय रुग्णालयांनी रुग्णांकडून कोणतीही अनामत रक्कम मागू नये. आपत्कालीन परिस्थितीमध्ये अनामत रकमेअभावी धर्मादाय रुग्णालयामध्ये कोणत्याही रुग्णावर उपचार नाकारता येणार नाहीत. या रुग्णालयांनी उपचार नाकारले तर रुग्णाला किंवा नातेवाईकांना संबंधित जिल्हय़ातील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडे नोंदणी करता येईल. धर्मादाय रुग्णालयाकडून नियमांचे उल्लंघन होत असेल तर धर्मादाय आयुक्त अशा रुग्णालयांना सवलत, फायदे दिलेले आहेत ते काढून घेण्यासाठी सरकारला शिफारस करू शकतात. त्याशिवाय दंडात्मक कारवाईचे अधिकारही आयुक्तांना असणार आहेत.
खाटा नाहीत ही सबब चालणार नाही
धर्मादाय रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध नाही या सबबीखाली निर्धन रुग्णांवर उपचार नाकारण्यात येतात; पण खाटा उपलब्ध नाहीत हे तात्पुरते कारण असू शकते. त्याचा गैरवापर करून उपचार नाकारल्यास अशा रुग्णालयांवर निश्चितपणे कारवाई होईल. रुग्णांनी ही बाब देखरेख समितीच्या निदर्शनास आणून द्यावी. त्याचा अहवाल धर्मादाय आयुक्तांना सादर होईल. त्यात तथ्य आढळल्यास रुग्णालयावर कडक कारवाई होईल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List