कुलभूषण जाधव यांना सोडवू शकले नाहीत याचे आणि पुलवामा हल्ल्याचेही क्रेडिट घ्या, संजय राऊत यांचा घणाघात
मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा आणि डेव्हिड हेडली आहे. त्यातील राणाला हिंदुस्थानात आणले. एक दहशतवादी आपल्या हाताला लागला आणि त्याला अमेरिकेतून आणले याचे नक्कीच कौतुक आहे. पण राणावर खटला चालवून त्याला फासावर लटकवायचे की राणा फेस्टिव्हल करायचा हे भाजपला ठरवायचे आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत शुक्रवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना म्हणाले.
तहव्वूर राणाला आणण्यासाठी 2009 पासून भारत सरकार प्रयत्न करते. 2009 ला राणा आणि हेडलीविरुद्ध एनआयएने पहिली एफआयआर दाखल केली. त्यानंतर एनआयएचे पथक अमेरिकेतील शिकागोला जाऊन राणा आणि हेडलीची चौकशीही करून आले. तेव्हापासून ही प्रक्रिया सुरू आहे. 2012 ला परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद आणि तेव्हाचे विदेश सचिव अमेरिकेत जाऊ राणाला हिंदुस्थानात पाठवण्यासंबंधी हिलरी क्लिंटन यांच्याशी चर्चाही करून आले. राणाला हिंदुस्थानात आणण्याची प्रक्रिया निरंतर सुरू आहे. त्यामुळे आम्ही भारत सरकार म्हणतो, कोणताही पक्ष नाही. तुम्ही क्रेडिट घ्यायला आणले असेल तर त्याचे पुतळे उभारा आणि खाली बसून फोटो काढा, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असून तुम्ही क्रेडिट कसले घेता? असा सवाल राऊत यांनी केला. राणाचे क्रेडिट घेणार असाल तर पुलवामा हल्ल्याचेही क्रेडिट घ्या. कूलभूषण जाधव यांना सोडवू शकला नाहीत याचेही क्रेडिट घ्या. एक निवृत्त नौदल अधिकारी पाकिस्तानी तुरुंगात अनेक वर्षापासून खितपत पडला आहे. आता घुसा आणि त्यांना घेऊन या. राजनाथ सिंह आणि भाजपचे लोक म्हणतात की घुसकर ले के आयेंगे. मग कुलभूषण जाधव, निरव मोदी, मेहुल चोक्सी यांना घेऊन या, असे आव्हानच राऊत यांनी दिले. तसेच बिहार आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी राणाला फासावर लटकवले जाईल आणि संपूर्ण देशात पुन्हा राणा फेस्टिव्हल साजरा करण्याची भाजपची योजना आहे, असा दावाही राऊत यांनी केला.
मोदी-ट्रम्प यांच्या भेटीदरम्यान राणाच्या प्रत्यार्पणाविषयी चर्चा झाल्याची आवई उठवणाऱ्यांनाही राऊत यांनी झापले. दोघांची चर्चा झाल्याचे तुम्ही ऐकले का? असा सवाल करत राऊत म्हणाले की, मोदींना घ्यायला ट्रम्प त्या दिवशी व्हाईट हाऊसच्या बाहेरली आले नाही. राणाला कायदेशीर प्रक्रियेतून आणले आहे. याआधी पोर्तुगाललमधून अबू सालेमला आणलेले आहे. 2005 च्या दरम्यान अबू सालेमला आणले, त्यासाठीही कायदेशीर आणि न्यायिक प्रक्रिया पार पाडावी लागली होती. हे भारत सरकार, तपास यंत्रणा, एनआयए, परराष्ट्र खाते आणि त्याच्या डिप्लोमसीचे यश आहे. याता कोणत्या पक्षाशी संबंध नसतो.
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला 18 दिवसांची NIA कोठडी, मध्यरात्री अडीच वाजता झाली सुनावणी
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List