राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी, दर 24 तासांनी वैद्यकीय तपासणी करण्याचे न्यायाधीशांचे आदेश
तब्बल 166 निरपराध नागरिकांचा बळी घेणारा, 26 नोव्हेंबर 2008 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड, लष्कर ए तोयबाचा दहशतवादी तहव्वूर हुसेन राणा याला गुरुवारी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास एनआयएच्या विशेष न्यायालयाने 18 दिवसांची एनआयए कोठडी दिली. एनआयएने राणाची 20 दिवसांची कोठडी मागितली होती. दरम्यान, राणाच्या चौकशीत मुंबईवरील हल्ल्यातील पाकिस्तानचा सहभाग, राणा आणि हेडलीची नेमकी भूमिका, तसेच दहशतवादी कारवायांचे अनेक पदर उलगडले जाण्याची शक्यता आहे.
दर 24 तासांनी राणाची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश न्यायाधीशांनी एनआयएसह संबंधित तपास यंत्रणांना दिले. एनआयएच्या विशेष न्यायालयात एनआयएचे प्रतिनिधित्व ज्येष्ठ वकील दयान कृष्णन आणि विशेष सरकारी वकील नरेंद्र मान यांनी केले. त्याचवेळी दिल्ली कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे वकील पीयूष सचदेवा यांनी राणाची बाजू न्यायालयात मांडली. दरम्यान, राणाला एक दिवसाआड वकिलांची भेट घेण्याची परवानगी एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिली. आता राणाची एनआयए मुख्यालयात कसून चौकशी केली जाणार आहे.
राणाला घेऊन आलेले विशेष विमान नवी दिल्लीतील पालम विमानतळावर उतरल्यानंतर त्याला कडक सुरक्षेत पटियाला हाऊस न्यायालयात आणण्यात आले. येथे राणाला विशेष एनआयए न्यायाधीश चंद्रजित सिंह यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.
न्यायालयात काय घडले?
न्यायाधीशांनी राणाला त्याच्याकडे वकील आहे का? अशी विचारणा केली. त्यावेळी राणाने माझ्याकडे कुणीही वकील नाही, असे सांगितले. यावर दिल्ली न्यायिक सेवा प्राधिकरण राणाला वकील देईल, असे सांगितले. त्यानंतर राणाची बाजू मांडण्यासाठी वकील पीयूष सचदेवा यांची नियुक्ती करण्यात आली. राणाच्या चौकशीत मुंबईवरील हल्ल्याच्या कटाबाबत महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते. तसेच 17 वर्षांपूर्वी मुंबईत ज्या-ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथे त्याला नेऊन अधिक चौकशी करण्यासाठी राणाची कोठडी देण्यात यावी असा युक्तिवाद एनआयएच्या वकिलांनी केला. त्यानंतर न्यायाधीशांनी राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी दिली.
एक दिवसाआड वकिलांना भेटण्याची परवानगी
राणाला एक दिवसाआड वकिलांची भेट घेण्याची परवानगी एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिली. तसेच त्याला केवळ सॉफिट टीप पेन म्हणजेच अणुकुचिदार नसलेला आणि हलक्या मटेरियलने तयार केलेला पेन वापरण्याची परवानगी देण्यात आली. एनआयए अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऐकू येईल इतके अंतर ठेवून राणाला वकिलांना भेटण्याची परवानगी देण्यात आली.
क्राइम सीन पुन्हा निर्माण करणार
मुंबईवरील हल्ल्यादरम्यान ज्याठिकाणी हल्ले झाले त्याठिकाणी राणाला नेऊन क्राइम सीन पुन्हा निर्माण करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त खोलात जाऊन राणाची चौकशी करण्यात येणार असून त्याचे आणि हेडलीचे असलेले दहशतवादी कारवायांचे जाळे राणाच्या चौकशीत उघड करण्याचा प्रयत्न होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, राणाला दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात हजर करतेवेळी एनआयए, पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक, दिल्लीचे पोलीस आयुक्त आणि पाच पोलीस उपायुक्त उपस्थित होते.
एनआयएने काय बाजू मांडली?
n मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रमाणेच देशभरातील विविध शहरांमध्ये भयंकर हल्ला करण्याचा राणा आणि हेडली या दोघांचा कट होता, असे एनआयएने म्हटले आहे. या हल्ल्याला अनेक पदर असू शकतात. त्यामुळे त्याची कसून चौकशी करण्याची गरज आहे.
n मुंबईतील विविध ठिकाणांची रेकी केली गेली. त्यानुसार देशभरात महत्त्वाच्या शहरांमध्येही रेकी गेली असू शकते. त्यामुळे त्याची कठडी हवी असल्याचे एनआयएच्या वकिलांनी न्यायाधीशांना सांगितले.
n मुंबई हल्ल्यातील दुसरा आरोपी डेव्हिड कोलमन हेडलीने हिंदुस्थानात येण्याआधी राणासोबत संपूर्ण ऑपरेशनबद्दल चर्चा केली होती.
n हल्ल्यादरम्यान कोणती आव्हाने येऊ शकतात याबद्दल हेडलीने राणाला ई-मेलद्वारे सविस्तर माहिती दिली होती. हेडलीने राणाला या कटात इलियास कश्मिरी आणि अब्दुर रहमान यांचाही समावेश असल्याची माहिती दिली होती. या सर्व बाबी पाहता राणाची 20 दिवसांची कोठडी देण्यात यावी, अशी मागणी एनआयएने न्यायाधीशांकडे केली.
पायात आणि कमरेला साखळदंड
अमेरिकन न्याय विभागाने तहव्वूर राणाचे फोटो जारी केले असून त्यात तो अमेरिकन मार्शल्ससोबत आणि कारागृहातील पैद्यांच्या कपडय़ांमध्ये दिसत आहे. अमेरिकेने जारी केलेल्या या फोटोत अमेरिकन मार्शल्स राणाला हिंदुस्थानकडे सोपवताना दिसत आहेत. या पह्टोत राणाच्या कमरेला आणि पायात साखळदंड दिसत आहेत. परंतु, त्याचा चेहरा दाखवण्यात आलेला नाही. राणाची अद्याप ओळख परेड झालेली नाही. त्यामुळे त्याचा चेहरा दाखवला जात नसल्याचे समोर आले आहे. ओळख परेडनंतर त्याचा चेहरा अधिकृतपणे प्रसिद्ध केला जाऊ शकतो.
तिहार कारागृहात ठेवणार
राणाला दिल्लीतील तिहार कारागृहात उच्चस्तरीय सुरक्षा वॉर्डमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्याला नेमके कुठल्या वॉर्डात ठेवणार याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पालम विमानतळावर आल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याला एनआयएच्या मुख्यालयात नेण्यात आले.
दहशतवाद संपवण्यासाठी हिंदुस्थानला सहकार्य- अमेरिका
दहशतवादासारखी जागतिक समस्या मुळापासून नष्ट करण्यासाठी हिंदुस्थानला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. मुंबईवरील हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना पकडण्यासाठी आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा ठोठावण्याच्या दृष्टीने अमेरिकेने सातत्याने हिंदुस्थानला पाठिंबाच दिला आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवत्ते टॅमी ब्रूस यांनी सांगितले.
राणा म्हणाला होता, हिंदुस्थानी त्याच हल्ल्याच्या लायकीचे
हिंदुस्थानी 26/11 सारख्याच हल्ल्याच्या लायकीचे आहेत. मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या सर्व दहशतवाद्यांना निशाण-ए-हैदर या पाकिस्तानच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करायला हवे, असे विधान राणाने हेडलीशी बोलताना केले होते, असा दावा अमेरिकेच्या न्याय विभागाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. पाकिस्तानचा हा शौर्य पुरस्कार युद्धातील वीरांना आणि शहीदांना देण्यात येतो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List