आधी पुनर्वसनाची हमी द्या, नंतरच एलफिन्स्टन ब्रीज तोडा, हक्काच्या घरासाठी प्रभादेवीचे रहिवासी
आधी आमच्या पुनर्वसनाची हमी द्या आणि नंतरच एल्फिन्स्टन ब्रीज तोडा, अशी आक्रमक भूमिका घेत प्रभादेवीचे शेकडो रहिवासी आज रस्त्यावर उतरले. मात्र एमएमआरआरडीच्या माध्यमातून जबरदस्तीने ब्रीजवर बुलडोझर चालवण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी पुलाचे पाडकाम बंद पाडले. रात्री उशिरापर्यंत शेकडो रहिवाशांनी ब्रीजवरच ठाण मांडले.
वरळी-शिवडी कनेक्टरसाठी सुमारे सव्वाशे वर्षे एल्फिन्स्टन ब्रीज एमएमआरडीएच्या माध्यमातून पाडण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. पाडकामासाठी शुक्रवारी रात्रीपासून पुलावरून वाहतूक बंद करण्याची घोषणाही करण्यात आली. मात्र डबलडेकर कनेक्टरला लागूनच असलेल्या 19 इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन नेमके कुठे करणार याची हमी प्रशासनाकडून दिली जात नसल्याने रहिवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला. या कनेक्टरसाठी लक्ष्मी निवास आणि हाजी नूरानी या इमारती बाधित होणार असून शेकडो रहिवाशांना आणि दुकानदारांना फटका बसणार आहे. पुलाच्या कामामुळे आसपासच्या जुन्या इमारतींना तडे जाऊन भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असा सवाल या रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
घराच्या बदल्यात घर द्या, अन्यथा तीव्र आंदोलन
- ब्रीज तोडण्याआधी आम्हाला घराच्या बदल्यात घर द्या, अशी मागणी केली असताना ब्रीजचे पाडकाम सुरू केल्याने रहिवासी रस्त्यावर उतरले. काही दिवसांपूर्वी एमएमआरडीएसोबत झालेल्या बैठकीत प्रकल्पबाधितांना देण्यासाठी घरे किंवा दुकाने उपलब्ध नसल्यामुळे त्या बदल्यात आर्थिक मोबदला देण्याची त्यांनी तयारी दर्शवली.
- हा मोबदला तुटपुंजा असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. जबरदस्तीने आमचे पुनर्वसन करायचा प्रयत्न कराल तर सरकारला रहिवाशांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही यावेळी दिला. त्यामुळे घराच्या बदल्यात घर द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, सोमवारी एमएमआरडीए आणि रहिवाशांमध्ये बैठक होणार असून त्यानंतरच पूल तोडा अशी भूमिका रहिवाशांनी घेतली आहे.
बेस्ट बसच्या सेवेवरही परिणाम
एल्फिन्स्टन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने बेस्ट बसच्या सेवेवरही परिणाम झाला आहे. या पुलावरून परळ, वरळी, वडाळा या परिसरांना जोडणाऱया बस क्रमांक 162, 168, 177 व 201 या गाडय़ा धावायच्या. या बसेसची वाहतूक आता दीपक सिनेमा, लोअर परेल वर्कशॉप, करी रोड पूलमार्गे भारतमाता सिनेमा या पर्यायी मार्गाने सुरू राहणार आहे, मात्र याबाबत बेस्ट उपक्रमाने शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत अधिकृत माहिती दिली नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List