सामना अग्रलेख – सय्यद आदिल हुसेन शाह, जय हिंद!

सामना अग्रलेख – सय्यद आदिल हुसेन शाह, जय हिंद!

धर्माच्या नावावर सतत राजकारण करणाऱयांनी वातावरण बिघडवले व त्यातून भारत आणि कश्मीरात दरी निर्माण झाली. कश्मीर हा फक्त भारत-पाकिस्तान, हिंदू-मुसलमान असा निवडणूक प्रचाराचाच विषय कायम राहिला. सय्यदच्या महान बलिदानाने हे सर्व संपायला हवे, पण भाजप हे चांगले घडू देईल काय? पंतप्रधान मोदी, अमित शहा पाकिस्तानला धडा शिकवायची भाषा करतात, पण देशासाठी बलिदान केलेल्या सय्यदचा साधा गौरवाने उल्लेख करायला तयार नाहीत. हे अमानुष आहे. सय्यदचे स्मरण देश आणि हिंदू सदैव ठेवतील!

सय्यद आदिल हुसेन शाह हा कश्मीरात हिंदू पर्यटकांचे प्राण वाचवताना शहीद झाला आहे. सय्यदच्या वडिलांनी सांगितले, ‘‘माझा मुलगा गेला. त्याचे कुटुंब निराधार झाले. आमच्या पुढच्या आयुष्याचे काय होईल ते पाहू, पण माझ्या मुलाने ज्या कारणासाठी प्राणत्याग केला, त्याबद्दल मला गर्व आहे.’’ सय्यद आदिल हुसेन शाह मानवता आणि राष्ट्रभक्तीचे एक ज्वलंत उदाहरण आहे. सय्यदची लहान मुले पोरकी झाली आहेत. पर्यटकांना घोड्यावरून फिरवण्याचे काम तो करीत होता व त्यावरच त्याचा घरसंसार चालत असे. पर्यटकांची सेवा करणे हाच त्याचा धर्म होता व असे असंख्य सय्यद कश्मीर खोऱ्यात मेहनत करून इमानेइतबारे जगत आहेत. सय्यदला ‘कलमा’ म्हणता, वाचता येत होता. त्यामुळे पहलगाममधील हल्ल्यात ‘मुसलमान’ म्हणून त्याला सहज प्राण वाचवता आले असते. त्याने तो स्वार्थ किंवा गद्दारी केली नाही व सच्चा देशभक्त म्हणून सर्व हिंदू पर्यटकांचे प्राण वाचवण्यासाठी त्या धर्मांध अतिरेक्यांशी झगडत राहिला. भारतीय सैनिक जे सीमेवर करतो तेच सय्यदने केले. त्याचे प्राण त्यात गेले. सय्यद हुतात्मा झाला नसता व त्याच्या बलिदानाची कथा हिंदू पर्यटकांच्या तोंडून बाहेर पडली नसती तर एव्हाना भाजप, बजरंगी वगैरे लोकांनी देशातील मुसलमानांच्या विरोधात आग भडकवायला सुरुवात केली असती. पहलगाममधील हल्ल्यास हिंदू-मुसलमान रंग चढवण्याचे समाजमाध्यमी उद्योग सुरू असतानाच सय्यदचे बलिदान समोर आले. सय्यदचे बलिदान हे राष्ट्रीय एकात्मतेसाठी वरदान आहे. कश्मीर खोऱ्यातील मुसलमानांवर पाकधार्जिणे असल्याचा आरोप केला जातो. ते अतिरेक्यांचे समर्थक असल्याचे ओरडून सांगितले गेले. या सर्व आरोपांचे मनोरे

सय्यदच्या बलिदानाने

उद्ध्वस्त झाले. मुसलमान देशद्रोही आहे, गाय-बैल चोरणारा, भररस्त्यात हिंदू महिलांची मंगळसूत्रे चोरणारा असल्याची बेताल विधाने पंतप्रधान मोदी यांनी कालच्या निवडणूक प्रचारात केली होती. त्या अपप्रचाराला सय्यदने मोठी किंमत मोजून उत्तर दिले. भाजपचा एक दळभद्री खासदार निशिकांत दुबे हा मोदी-शहांच्या आतल्या गोटातला आहे. त्याने या गंभीर परिस्थितीत राष्ट्रीय एकात्मतेचा मान न ठेवता मौज केली. तो म्हणतो, ‘‘मी आता कलमा शिकायला सुरुवात केली आहे. काय सांगावे, जीव वाचवण्यासाठी कलमा पढण्याची वेळ कधीही येईल!’’ हे असे विखार म्हणजे सय्यदच्या बलिदानाची थट्टा आहे व ते भाजपचेच लोक करू शकतात. दुबे यांच्या माहितीसाठी सांगायचे तर अतिरेक्यांनी गोळीबार सुरू करताच काही महिलांनी पतीच्या प्राणाची भीक मागितली. आपल्या कपाळावरच्या टिकल्या काढल्या. ‘अल्ला हो अकबर’ म्हणू लागल्या. तरीही अतिरेक्यांचे मन द्रवले नाही. त्यांनी हिंसा केलीच व सय्यद त्यांचे प्राण वाचवायला मध्ये आला तेव्हा धर्म न पाहता अतिरेक्यांनी सय्यदला मारले. भारत हाच सय्यदचा धर्म होता व त्यासाठीच तो मेला हे दुबेसारख्यांना कसे सांगणार? सय्यदप्रमाणे अनेक मुसलमान सुरक्षा रक्षक, पोलीस कश्मीर खोऱ्यात अतिरेक्यांशी लढताना मेले. त्यात असंख्य मुसलमान आहेत. राष्ट्रपती भवनात शौर्य पदकांचे वितरण होत असताना कश्मीरातील मुसलमान शहीद पोलिसांचे माता-पिता, पत्नी येतात तेव्हा त्यांच्या बलिदानाने

भारतमाताही रोमांचित

होत असेल. असे असंख्य सय्यद भारतमातेच्या पुशीत जन्माला येतात, देशासाठी जगतात व वेळ येताच कुर्बान होतात. सय्यदचे बलिदान समोर आले. कारण शेकडो हिंदू पर्यटकांनी सय्यदच्या मानवतेचे स्मरण केले. सय्यदचे बलिदान वाया जाता कामा नये व त्याचे कुटुंबही उघड्यावर पडता कामा नये. सरकारने त्याच्या बलिदानाचा गौरव करायला हवा आणि त्याच्या कुटुंबालाही आधार द्यायला हवा. त्यातून भारतमातेचे रक्षण करणारे अनेक सय्यद निर्माण होतील. देशभरात कश्मिरी विद्यार्थी शिकत आहेत. त्यांना आता असुरक्षित वाटत आहे व त्यांनी कश्मीरकडे परतायला सुरुवात केल्याचे वृत्त धक्कादायक आहे. समाजमाध्यमांवर इन्शाह अल्ताफ यांनी वेदना मांडली आहे, ‘‘मी कश्मिरी आहे. सध्या दिल्लीत राहतोय. आज सकाळी मी किराणा सामान आणण्यासाठी दुकानात आलो. दुकानदाराने मला विचारले, तुम्ही लोक भारतीयांवर हल्ले का करीत आहात? हा प्रश्न माझ्यासाठी धक्कादायक आहे. त्याच्या डोक्यात हे विष कोणी भरवलंय की, आम्ही कश्मिरी लोक भारतीय नाही? माझ्या मनाला असंख्य इंगळ्या डसल्या. मी सामान न खरीदताच परत आलो व खिन्न होऊन बसलो.’’ धर्माच्या नावावर सतत राजकारण करणाऱ्यांनी वातावरण बिघडवले व त्यातून भारत आणि कश्मीरात दरी निर्माण झाली. कश्मीर हा फक्त भारत-पाकिस्तान, हिंदू-मुसलमान असा निवडणूक प्रचाराचाच विषय कायम राहिला. सय्यदच्या महान बलिदानाने हे सर्व संपायला हवे, पण भाजप हे चांगले घडू देईल काय? पंतप्रधान मोदी, अमित शहा पाकिस्तानला धडा शिकवायची भाषा करतात, पण देशासाठी बलिदान केलेल्या सय्यदचा साधा गौरवाने उल्लेख करायला तयार नाहीत. हे अमानुष आहे. सय्यदचे स्मरण देश आणि हिंदू सदैव ठेवतील!

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“2034 पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री”, चंद्रशेखर बावनकुळेंचे भाकीत, हात जोडत शिंदे यांची एका शब्दात मोठी प्रतिक्रिया “2034 पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री”, चंद्रशेखर बावनकुळेंचे भाकीत, हात जोडत शिंदे यांची एका शब्दात मोठी प्रतिक्रिया
महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री पदावरून झालेले नाट्य उभ्या महाराष्ट्राने पाहिले. एकनाथ शिंदे अचानक गावी गेले. तिथून ठाण्यात आले. त्यानंतर दिल्लीतील...
आम्हाला इथंच गोळ्या घाला, पण पाकिस्तानसारख्या नरकात परत पाठवू नका! निर्वासित हिंदूंची याचना
तडजोडीची वेळ गेली, इंदिरा गांधींसारखा एक धाव घाला अन् पाकिस्तानचे 2 तुकडे करा! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी
डहाणू, तलासरीत आंब्याला कागदी पिशव्यांचे सुरक्षा कवच; पक्षी, ढगाळ वातावरणाने बागायतदारांची डोकेदुखी
महाराष्ट्रातील वातावरणात मोठे बदल, एकीकडे उष्णतेचा ऑरेंज अलर्ट, दुसरीकडे गारपीटचा अंदाज
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेचाही 35 तासांच्या ब्लॉकमुळे 163 ट्रेन रद्द
मुंबई-नाशिक महामार्गावर बसचा भीषण अपघात, 8 वर्षांच्या चिमुकलीने गमावला जीव, अनेक जखमी