जम्मू–कश्मीरमध्ये कोम्बिंग ऑपरेशन घराघरांत दहशतवाद्यांचा शोध सुरू, त्राल येथे दहशतवादी आसिफ शेखचे घर बॉम्बस्फोटात उडाले
पहलगामच्या बैसरन व्हॅलीत पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून अंदाधुंद गोळीबार केला आणि भयंकर नरसंहार घडवून आणला. त्या दहशतवाद्यांना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा मिळेल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्यानंतर जम्मू कश्मीरमध्ये सुरक्षा दल, पोलिस आणि सीआरपीएफने संयुक्तपणे कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. घराघरांत दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान, हा इस्लामिक टेरर अॅटॅक असून अतिरेक्यांना शोधण्यासाठी हिंदुस्थानची मदत करणार, अशी घोषणा अमेरिकेने केली.
कश्मीरच्या कठुआ येथे आज दुपारी 4 संशयित दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराच्या जवानांनी कठुआ परिसराला घेराव घातला. याचदरम्यान, बंदीपोरा जिह्यातील कुलनार बाजीपोरा येथे आज सकाळी दहशतवाद्यांसोबत जोरदार चकमक उडाली. यात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. नियंत्रण रेषेजवळ गस्त वाढवण्यात आली असून हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या माध्यमातून सर्वत्र नजर ठेवली जात आहे.
एलओसीवर पाकिस्तानकडून गोळीबार
गुरुवारी रात्रीपासून पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर अंधाधुंद गोळीबार सुरु आहे. या गोळीबाराला लष्कराचे जवानही चोख प्रत्युत्तर देत आहेत. पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांमधून हा गोळीबार सुरू आहे. यात हिंदुस्थानच्या बाजूला कुठल्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याची माहिती लष्करी अधिकाऱयांनी दिली.
पाकिस्तानने सैनिकांची तैनाती वाढवली
पाकिस्तानने राजस्थानच्या समोरील आंतरराष्ट्रीय सीमेवर आपल्या सैनिकांची तैनाती वाढवली आहे. हा भाग बहावलपूरचा असून तिथे जैश ए मोहम्मदचे मुख्य मुख्यालय आहे. पाकिस्तानी लष्कराने 31 नव्या कोअरचे लेफ्टनंतर जनरल साकिब महमूद मलिक यांना याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर जैशच्या मदरशाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी येथे हवाई संरक्षण आणि रडार सक्रिय ठेवण्याचा सल्ला दिला आहे. तसेच वाघा बॉर्डरही बंद करण्यात आली आहे.
दहशतवाद्यांच्या घरांवर कठोर कारवाई
दहशतवादी हल्ल्यात आसिफ शेख आणि अदिल हुसैन थोकर या दोन दहशतवाद्यांची नावे समोर आली. पोलीस आसिफ आणि अदिलच्या घरी सर्च ऑपरेशनसाठी पोहोचले. आसिफच्या त्राल येथील घरी पोहोचले असता त्याच्या घरातील स्पह्टकांचा स्पह्ट झाला. तर आदिलच्या अनंतनागमधील बीजबेहरा येथील घर बुलडोझरने उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुरक्षा दलाचे जवान आसिफच्या घरी गेले असता त्यांना काही संशयित वस्तू आणि स्पह्टके आढळली. धोक्याची शक्यता लक्षात घेत सुरक्षा दलाचे जवान तेथून मागे हटले. त्याचवेळी मोठा स्पह्ट झाला आणि संपूर्ण घर उद्ध्वस्त झाले. पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा तपासासाठी घरी धडकतील याचा अंदाज घेऊन आधीच येथे स्पह्टके पेरून ठेवली असावीत, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हिमाचल राजभवनमधून पाकिस्तानचा ध्वज हटवला
हिमाचल येथील राजभवनमध्ये शिमला करार ज्या ऐतिहासिक टेबलावर झाला तिथे पाकिस्तान आणि हिंदुस्थानचे ध्वज ठेवण्यात आले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर आणि पाकिस्तानवर करण्यात आलेल्या कारवाईनंतर येथून पाकिस्तानचा ध्वज हटवण्यात आला. शिमला कराराची स्मृती म्हणून गेल्या 53 वर्षांपासून येथे पाकिस्तानचा टेबल ध्वज ठेवण्यात आला होता. दरम्यान, शिमला करार रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर हा ध्वज हटवण्यात आल्याची माहिती राजभवनचे सचिव सीपी वर्मा यांनी दिली.
विधानसभेचे 28 एप्रिलला विशेष अधिवेशन
पहलगाम हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी जम्मू आणि कश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी 28 एप्रिलला एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. जम्मू आणि कश्मीर मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List