एनसीबीच्या जाचाला कंटाळून बिल्डरची आत्महत्या, ड्रग्ज तस्करीत एक मुलगा तुरुंगात, दुसरा परदेशात
दोन्ही मुले ड्रग्ज तस्करीच्या जाळ्यात अडकल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या चौकशीच्या जाचाला कंटाळून गुरुनाथ चिंचकर या बांधकाम व्यावसायिकांनी आज सकाळी आत्महत्या केली. चिंचकर यांचा एक मुलगा ड्रग्ज तस्करीप्रकरणी तुरुंगात आहे, तर एक परदेशात पळून गेला आहे. फरारी मुलाच्या शोध घेण्यासाठी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी चिंचकर यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला होता. अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या या छळवणुकीला कंटाळून चिंचकर यांनी आज सकाळी साडेसहा वाजता बेलापूर येथील घरी रिव्हॉल्व्हरमधून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आपले जीवन संपवले. याप्रकरणी एनआरआय पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गुरुनाथ चिंचकर यांचा मुलगा नवीन चिंचकर याच्यावर ड्रग्ज तस्करीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. मुंबईच्या अमली पदार्थ नियंत्रण विभागाने गेल्या काही महिन्यांपूर्वी नवी मुंबईत धडक कारवाई करून सुमारे 200 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते. हे ड्रग्ज नवीन याने आणले असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. तेव्हापासून एनसीबीचे पथक नवीन याचा कसून शोध घेत आहे. मात्र नवीन सध्या परदेशात पळून गेला आहे. त्याचा शोध
घेण्यासाठी एनसीबीच्या पथकाने गुरुनाथ चिंचकर यांची कसून चौकशी सुरू केली होती. आजही त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चिंचकर सध्या बेलापूरमधील एनआरआय पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या आपल्या घरात राहत होते. आज सकाळी 6 वाजता ते नेहमीप्रमाणे आपल्या इमारतीमधून खाली आले आणि आपल्या कार्यालयात बसले. साडेसहाच्या सुमारास त्यांनी आपल्या रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून घेतली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना नजीकच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List