मला माफ करा… पण? ब्राह्मणांवर दिलेल्या विधानानंतर अनुराग काश्यप नरमला
प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेता अनुराग कश्यपने ब्राह्मण समाजावर दिलेल्या विधानानंतर त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. त्याच्या विरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रारही दाखल करण्यात आली आहे. अनुराग कश्यपने एक पोस्ट लिहिली होती. त्यातून त्याने ब्राह्मणांना लक्ष्य केलं होतं. याच पोस्टवर एका नेटकऱ्याला उत्तर देताना अनुराग थेट ब्राह्मणांवरच घसरला होता. अत्यंत खालच्या थराची टीका त्याने केली होती. त्यामुळे अनुराग कश्यप कायदेशीर पेचात अडकण्याची चिन्हे दिसत आहे. त्यामुळेच त्याने सपशेल शरणागती पत्करून माफी मागून या प्रकरणआवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्याने संपूर्ण पोस्टवर माफी मागितली नाही. फक्त पोस्टमधील ब्राह्मणांबद्दलच्या उल्लेखावर त्याने माफी मागितली आहे.
अनुराग कश्यप आणि वादाचं जुनचं समीकरण आहे. आता तो ब्राह्मणांच्या निशाण्यावर आला आहे. प्रतिक गांधी आणि पत्रलेखा यांच्या फुले सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली आहे. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. या वादात अनुरागनेही उडी घेतली होती. तसेच या सिनेमाचं समर्थन करताना ब्राह्मणांना झोडपले होते. त्यानंतर सोशल मीडियातून त्याला सातत्याने ट्रोल केलं जात आहे. त्यामुळेच हे वादळ थांबवण्यासाठी त्याने माफी मागितली आहे. ९
शब्द परत घेता येत नाहीत
अनुरागने इन्स्टाग्रामवर नव्याने पोस्ट केली आहे. त्याने त्याच्या शैलीतच त्याचा माफीनामा दिला आहे. ही माझी माफी आहे. त्या पोस्टसाठी नाही, तर पोस्टमधील त्या लाइनसाठी, जी आऊट ऑफ कंटेक्स्ट काडून द्वेष निर्माण केला जात आहे. कोणतंही विधान माझी मुलगी, कुटुंब, दोस्त आणि सहकाऱ्यांना मिळणाऱ्या रेप आणि खुनाच्या धमकीहून मोठं नाही. बोललेले शब्द परत मागे घेतले जाऊ शकत नाहीत. मी घेणार नाही. मला शिव्या द्यायच्या तर द्या, असं अनुरागने म्हटलं आहे.
माफी हवीय, घ्या मग
माझ्या कुटुंबाने काही म्हटलं नाही आणि कधी काही म्हणत नाही. म्हणूनच माझ्याकडून माफी हवी असेल तर घ्या माझी माफी. ब्राह्मण लोक, महिलांना सोडा, एवढे संस्कार शास्त्रातही आहेत. केवळ मनुवादात नाही. तुम्ही कोणते ब्राह्मण आहात हे आधी ठरवा. बाकी माझ्याकडून माफी, असं तो म्हणतोय. अनुरागने नुकतीच इन्स्टावर एक पोस्ट टाकली होती. त्यात धडक 2 च्या स्क्रीनिंगमध्ये सेन्सॉर बोर्डाने सांगितलं की, भारतात कास्ट सिस्टिम संपली आहे. त्याचमुळे संतोष सिनेमा भारतात रिलीज झाला नाही. आता ब्राह्मणांचा फुले सिनेमावर आक्षेप आहे. अनुराग कश्यपच्या या विधानानंतर खळबळ उडाली होती. त्याला ट्रोल केले जात होते. भाजपचे सदस्य आणि बिग बॉसचे स्पर्धक तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी अनुरागवर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List