सिम्बॉयसीसमध्येही रुग्णांची हेळसांड, महिलेच्या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरने 20 हजार उकळले
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पैशांअभावी उपचार नाकारल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच लवळे येथील सिम्बॉयसीस युनिव्हर्सिटी रुग्णालयातील डॉक्टरने महिला रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्ण दगावण्याची भीती दाखवून शस्त्रक्रियेसाठी 20 हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी डॉक्टरविरोधात बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 4 ते 9 एप्रिल दरम्यान घडली.
डॉ. प्रवीण लोहोटे असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. दिलीप शिवशरण यांनी फिर्याद दिली आहे. बावधन ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी याबाबत माहिती दिली. आरोपी डॉ. लोहोटे हा रुग्णालयात शल्यचिकित्सक (सर्जन) आहे. फिर्यादींच्या चुलतीला पित्ताशयाचा त्रास होत होता. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे महिलेला उपचारासाठी सिम्बॉयसीस युनिव्हर्सिटी रुग्णालयात नेण्यात आले. बाह्यरुग्ण विभागात त्यांच्यावर काही दिवस उपचार सुरू होते. हे रुग्णालय धर्मादाय असतानाही डॉ. लोहोटे यांनी पैसे दिले तरच रुग्णावर उपचार करेन. नाहीतर उपचार करणार नाही, अशी भीती दाखवून रुग्णाच्या नातेवाईकांकडून 20 हजार रुपये उकळले. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनासह नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
डॉ. लोहोटे यांना काही दिवसांपूर्वीच दिला होता मेमो
सिम्बॉयसीस युनिव्हर्सिटी रुग्णालयात शल्यचिकित्सक असणाऱ्या डॉ. लोहोटे यांच्या विरोधात यापूर्वीही रुग्णालय प्रशासनाकडे काही तक्रारी आल्या होत्या. मात्र लेखी तक्रार कोणी करीत नव्हते. तरीही तोंडी आलेल्या तक्रारींची दखल घेत रुग्णालयाने काही दिवसांपूर्वी डॉ. लोहोटे याला वर्तणुकीत सुधारणा करण्याबाबत मेमो बजावला होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List