महाराष्ट्राचा आत्मा, भाषा, संस्कार मराठीच! ही आमची राजभाषा, इथे मराठीच चालणार; संजय राऊत यांनी ठणकावले
महाराष्ट्राचा आत्मा, संस्कार आणि भाषा मराठीच आहे. महाराष्ट्रात मराठीच चालणार असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी ठणकावले आहे. हिंदी भाषेला आमचा विरोध असण्याचे कारण नाही. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, तिचा सन्मान ठेवणे गरजेचे आहे. तसेच मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे, इथे मराठीच चालणार, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
मराठी भाषा सक्तीची करणे गरजेचे आहे. राज्यात मायमराठीची जी अवस्था आहे, त्यात सुधारणा होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारदावर मराठी भाषा सक्तीची झाली असेल मात्र, त्याची प्रत्यक्षात अंमलबाजावणी झालेली नाही. उद्योग, व्यवसाय, नोकरी, संवाद या सर्व ठिकाणी मराठी सक्तीची होत नाही, तोपर्यंत मराठी माणासाला सन्मानाचे स्थान मिळणार नाही. भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख व्यक्ती घाटकोपरमध्ये भाषण करतात. त्यात घाकोपरची भाषा गुजराती असे म्हणातात. भाजपचा कोणताही नेता मराठीबाबत ठामपणे बोलत नाही, असे बोलताना कोणी पाहिले आहे काय? असा सवालही त्यांनी केला.
महाराष्ट्राच्या निर्मितीत या लोकांचे काहीही योगदान नाही.संयुक्त महाराष्ट्राचा लढा, बेळगाव- कारवार सीमा प्रश्न यात त्यांचा सहभाग नाही. बेळगावात मराठी माणसांवर अन्याय, अत्याचार होत आहे, त्याबाबत भाजप नेते काहीही बोलत नाही. आता ते देशावर हिंदी लादत आहे. हिंदीला देशात विरोध असण्याचे कारणच नाही. हिंदी ही देशातील संवादाची भाषा आहे. हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा यांना इंग्रजी येत नाही म्हणून देशावर हिंदी लादू नका, असा जबरदस्त टोलाही त्यांनी लगावला.
मुंबई हा हिंदी सिनेसृष्टीचा उर्जास्रोत आहे. मुंबईत हिंदी सक्तीची करण्याची काय गरज आहे. हिंदी सिनेसृष्टी, हिंदी गाणे, हिंदी साहित्य हे सर्व मुंबईत आहे. महाराष्ट्रात हिंदी भाषा भवन, उत्तर भाषा भवन आहे. त्याला कोणीही विरोध केलेला नाही. तर मग आमच्यावर हिंदी का लादता, जिथे नाही तिथे हिंदीचा प्रचार, प्रसार करा, मात्र, त्याची सक्ती करू नका, असे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले. हिंदी अभ्यासक्रमात लादून विद्यार्थ्यांचे नुकसान करू नका. महाराष्ट्रात हिंदी सगळ्यांना येते, आम्हांला हिंदी शकवू नका, गुजरातमध्ये हिंदी सक्तीची करा. मात्र, प्रचार आणि प्रसार करत हिंदीचा सन्मान करण्याची गरज आहे, यावर त्यांनी भर दिला.
महाराष्ट्राचा आत्मा, भाषा, संस्कार मराठी आहे आणि मराठीच राहणार. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सर्व शाळांमध्ये मराठी सक्तीची करणे गरजेचे आहे. इंटरनॅशनल शाळांमध्ये मराठी सक्तीची करण्याची हिंमत त्यांच्यात आहे काय? नोकऱ्या मिळवण्यासाठी अजूनही मराठी सक्तीची करण्यात आलेली नाही. ते आधी करावे, त्यानंतर त्यांनी इतर भाषांवर बोलावे, असेही संजय राऊत यांनी सुनावले. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत हिंदी भाषेचे नाटक करण्यात येत आहे. सागर किंवा इतर बंगल्यावरून आलेले ट्विट स्क्रिप्टप्रमाणे सर्व सुरू आहे.एवढी तत्परता मराठी भाषेबाबत का दाखवत नाही, असा सवालही त्यांनी केला. भाषेचा मुद्दा पुढे करत भाजप राजकारण करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
मी मराठी, मी हिंदू, मी अमका, मी तमका अशी भाषा काहीजण करत आहेत. किती वेळा कपडे बदलाल, एकदा काय ती भूमिका स्पष्ट करा. शिंदे आणि फडणवीस त्यांचे कपडे उतरवतील. ते फक्त बंगल्यावरून आलेले स्क्रिप्ट वाचत आहेत. जनता ही सर्व मजा बघत आहे. कोणत्याही पक्षासाठी हे चांगले लक्षण नाही. फडणवीसांची भेट झाली की त्यांची भूमिका बदलते. मिंधे भेटले की लगेच भूमिकेत बदल ,हे योग्य नाही, असेही त्यांनी कोणचेही नाव न घेता सुनावले. ही सर्व सुपारीची कामे आहेत. उद्या कोणी सुपारी दिली तर त्यांनी उर्दूही चालेल, असा टोलाही त्यांनी लगावला.
बीडपेक्षा वाईट अवस्था सिंधुदुर्गची झाली आहे. त्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. बीड तर देवेंद्र फडणवीस यांच्या हाततून गेले आहे. सिंधुदुर्गात दिवसाढवळ्या खून ,मारामाऱ्या, अत्याचार होत आहेत. त्याविरोधात आवाज उठवण्याची वेळ आली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List