नगर जिल्ह्यातील 33 हजार 531 शिधापत्रिका रद्द, ई-शिधापत्रिकांचे 66 टक्के काम पूर्ण
शिधापत्रिकांची माहिती अद्ययावत करणे आणि योजनेचे निकष पूर्ण करणाऱ्यांनाच लाभ देण्यासाठी ई-शिधापत्रिकांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. आर्थिक उत्पन्न जास्त असताना, त्यापेक्षा कमी आर्थिक गटाची शिधापत्रिका असणे, नोकरी-व्यवसायानिमित्ताचे स्थलांतर आदी कारणांमुळे जिल्ह्यातील 33 हजार 531 शिधापत्रिका रद्द झाल्या आहेत. ई-शिधापत्रिकांची माहिती अद्ययावत करण्याचे काम आतापर्यंत सुमारे 66 टक्के झाले आहे.
उत्पन्न गटानुसार शिधापत्रिकांचे वर्गीकरण केलेले आहे. दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना पिवळ्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते. सुमारे 50 हजार ते एक लाखांच्या आत उत्पन्न असलेल्या कुटुंबाला केशरी शिधापत्रिका दिली जाते. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा जास्त आहे. त्या कुटुंबाला पांढऱ्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते. काही कुटुंबांनी वार्षिक उत्पन्न कमी दाखवून कमी उत्पन्न गटासाठी असलेली शिधापत्रिका बाळगून त्या आधारे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत होते.
केंद्र शासनाने ई-शिधापत्रिका देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. सध्याच्या स्थितीमध्ये राज्य सरकारकडे शिल्लक असलेल्या शिधापत्रिकांचे वितरण करून ते संपुष्टात आणण्यात येणार आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यभर फक्त ई-शिधापत्रिका अस्तित्वात येणार आहेत. ज्या दुकानात धान्य मिळते, तेथे ई-केवायसी करण्याची सोय आहे. या स्वस्त धान्य दुकानात जाऊन फोर-जी ई-पॉस मशीनद्वारे केवायसी केली जाते. यासाठी आधार कार्ड घेऊन जावे लागते. या मशीनमध्ये आधार क्रमांक टाकला जातो.
शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी करणे बंधनकारक असून, ते न केल्यास धान्यासह अन्य लाभबंद होऊ शकतात. सर्व्हरमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त झाला असून, नागरिकांनी ई-केवायसी तातडीने करून घ्यावी.
मीनाक्षी चौधरी, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी, अहिल्यानगर
या योजनांचा मिळतो लाभ
शिधापत्रिकांच्या माध्यमातून सार्वजनिक वितरण वस्तू स्वस्त धान्य दुकानातून दिल्या जातात. घरकुल योजना, उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत गॅस जोडणी, शौचालय योजना, मोफत वीजजोडणी, आयुष्मान भारत योजना, आरोग्य विमा योजना आदी योजनांचा लाभ घेता येतो.
रद्द शिधापत्रिकांची संख्या
संगमनेर – 3 हजार 61
श्रीगोंदे – 1 हजार 556
पारनेर – 4 हजार 464
नगर – 5 हजार 486
अकोले – 92
कर्जत – 2 हजार 76
श्रीरामपूर – 5 हजार 825
पाथर्डी – 1 हजार 74
राहुरी – 1 हजार 266
जामखेड – 802
नेवासे – 490
राहाता – 5 हजार 530
कोपरगाव – 533
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List