‘दीनानाथ’ला आमचे पैसे घ्या, पण उपचार अडवू नका! शिवसेनेचा धर्मादाय सहआयुक्तांना घेराव
पैशांसाठी उपचार नाकारल्याने झालेल्या गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज धर्मादाय सहआयुक्तांना घेराव घालून नोटा दाखवत, ‘दीनानाथ रुग्णालयाला हे आमचे पैसे घ्या, मात्र गरीबांचे उपचार अडवू देऊ नका,’ असे सांगण्यात आले. या घटनेबरोबरच संपूर्ण दीनानाथ रुग्णालयाची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. त्यावर सहआयुक्त रजनी क्षीरसागर यांनी चौकशीसाठी पाचजणांची समिती नेमण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
‘लता मंगेशकर फाऊंडेशन’ यांना एरंडवणे येथे नाममात्र भाडय़ाने सुमारे सहा एकर शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. या जमिनीवर दीनानाथ मंगेशकर धर्मादाय रुग्णालय बांधण्यात आले आहे. या धर्मादाय रुग्णालयास सर्व शासकीय नियम आणि योजना बंधनकारक आहेत. मात्र, या रुग्णालयाकडून रुग्णसेवा आणि नियमांची पायमल्ली केले जात असल्याची तक्रार शिवसेनेच्या वतीने धर्मादाय सहआयुक्तांकडे करण्यात आली. यावेळी झालेल्या आंदोलनामध्ये पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, उपशहरप्रमुख प्रशांत राणे यांच्यासह आदी उपस्थित होते.
जमेल तेवढे पैसे भरून अॅडमिट होण्यास सांगितले होते ः रुग्णालयाचे स्पष्टीकरण
15 मार्च रोजी गर्भवती महिला इंदिरा आयव्हीएफचे रिपोर्ट घेऊन डॉ. सुश्रुत घैसास यांना भेटली होती. अतिशय जोखमीच्या व धोकादायक गर्भधारणेबाबत डॉ. घैसास यांनी त्यांना माहिती दिली. तसेच त्यांना दर 7 दिवसांनी तपासणीस बोलावले. त्याप्रमाणे त्यांनी 22 तारखेस येणे अपेक्षित होते. परंतु, त्या तपासणीसाठी आल्या नाहीत. 28 मार्च रोजी महिला जेव्हा रुग्णालयात आली, तेव्हा तिला तातडीच्या उपचाराची गरज नव्हती. प्रसूतीनंतर नवजात बालकांना एनआयसीयूमध्ये उपचार द्यावे लागतील, त्यासाठी 10 ते 20 लाखांचा खर्च येऊ शकतो, याची माहिती रुग्णाला देण्यात आली होती. रुग्णाच्या नातेवाईकांनी वैद्यकीय संचालक डॉ. केळकर यांना फोन केला व आपली अडचण सांगितली. त्यावर डॉक्टर केळकरांनी जमतील तेवढे पैसे भरा असे सांगितल्याचे रुग्णालयाच्या चौकशी अहवालात म्हटले आहे.
चौकशीसाठी 4 जणांची समिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार या प्रकाराची चौकशी करण्यासाठी धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आली आहे.
ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी तज्ञ डॉक्टरांच्या समितीद्वारे करून कारवाई केली जाईल. पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबतची संपूर्ण माहिती घेतली आहे. आरोग्य विभागाने तातडीने, पारदर्शक आणि निष्पक्षपणे चौकशी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. – अजित पवार, उपमुख्यमंत्री
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List