‘आता मुस्लीम झाले, पुढे ख्रिश्चन, पारशी अन्…’, जितेंद्र आव्हाड यांचं ते ट्विट चर्चेत
वक्फ सुधारणा विधेयकाला लोकसभा आणि त्यानंतर राज्यसभेत देखील मंजुरी मिळाली आहे, त्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं आहे. हे ट्विट चांगलंच चर्चेमध्ये आलं आहे.
नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
”राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र ‘ऑर्गनायझर’ नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अंकात, ख्रिश्चन धर्मियांकडील जमिनीचा मुद्दा उचलला तसेच ही जमीन वक्फपेक्षा अधिक असल्याचे सदर अंकातील लेखामध्ये नमूद केले. वक्फच्या ताब्यात असलेल्या जमिनी या त्यांच्या पूर्वजांच्या आणि दान-धर्मातून मिळालेल्या जमिनी आहेत. त्या कुणा एका मुस्लीम इसमाच्या किंवा एका संस्थेच्या मालकीच्या नव्हत्या. वक्फ या शब्दाचा अर्थच मूळात दान असल्याने या सर्व जमिनी दानातून आल्याचे स्पष्ट होत आहे. भारतभर ख्रिश्चन धर्मियांकडे अनेक जमिनी आहेत. या जमिनी चर्चच्या ताब्यात आहेत अन् हे कोणालाही मान्य करावेच लागेल की, ख्रिश्चन धर्मियांनी वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात अभूतपूर्व काम केले आहे. भारतभर त्यांच्या शैक्षणिक संस्था पसरल्या आहेत. मला सांगायला अभिमान वाटतो की, मी देखील एका ख्रिश्चन संस्थेच्या शाळेतच शिक्षण घेतले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रात ख्रिश्चन धर्मियांकडील जमिनीचा विषय मांडल्यानंतर पहिला आवाज केरळात उचलला गेला आहे. त्यानंतर दिल्लीत बोंबाबोंब सुरू झाल्यावर ऑर्गनायझरने लेखातील तो भाग वगळला. तरीही त्यांच्या मनातील दुजाभाव आणि विष हे काही लपून राहिलेले नाही. गोळवलकर यांनी आपल्या ” बंच ऑफ थाॅटस” “आणि नेशनहूड आयडेंटीफाइड “ ख्रिश्चन आणि मुस्लिमांना देशाचे नागरिकत्व देण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करून त्यांना दुय्यम नागरिकत्व देण्याबाबत केले होते. ज्यावेळेस वक्फ बद्दल राज्यसभा आणि लोकसभेत चर्चा सुरू होती. त्यावेळेस हा लेख प्रसिद्ध करण्यात आला. त्यामुळे कुणी काहीही म्हटले तरी मातृसंस्था आणि भाजपचे खरे मार्गदर्शक हे गोळवलकर हेच आहेत. अन् त्यांच्या पुस्तकातच हे सर्व नमूद करण्यात आले आहे. कालांतराने ख्रिश्चन धर्मियांकडील जमिनी काढून घेण्यात येणार, ही न लपलेली गोष्ट आहे.
दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांनी कोलंबिया लाॅ स्कूलच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना, भारतात धार्मिक अल्पसंख्यांक आणि मागासवर्गीयांच्याच विरोधात द्वेषपूर्ण भाष्य केली जात आहेत. या दोन समूहांविरोधात चिथावणी दिली जात आहे. ही भाषणे राजकीय हेतूने केली जात आहेत. ते दुर्दैवी आणि चिंताजनक असून त्याकडे गांभीर्यपूर्वक पहायला हवे. काही राजकीय नेते आपल्या राजकीय स्वार्थासाठी अशी भाषणे करीत आहेत, असेही न्या. ओक यांनी आपल्या भाषणात म्हटले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यपत्रातील लेख आणि न्या. अभय ओक यांनी व्यक्त केलेली चिंता या दोन्ही बाबींचा विचार गांभीर्यपूर्वक करायला हवा. या देशातील अल्पसंख्यांक समूह हे धोक्यात आहेत, हे अभय ओक यांच्या भाषणातून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे ते केवळ राजकारणासाठी, हेही त्यांनी नमूद केले आहे. आता मुस्लीम झाले, पुढे ख्रिश्चन, पारशी, जैन आणि नंतर मागासवर्गीय अन् सर्वच धार्मिक व भाषिक अल्पसंख्यांक हे एका विशिष्ट गटाच्या निशाण्यावर असतील. हे सर्व वातावरण एकसंघ भारतासाठी अन् भारताच्या विकासासाठी पोषक तर नाहीच उलट भारताला पुन्हा एकदा पाचशे वर्ष मागे नेणारे आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र ‘ऑर्गनायझर’ नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अंकात, ख्रिश्चन धर्मियांकडील जमिनीचा मुद्दा उचलला तसेच ही जमीन वक्फपेक्षा अधिक असल्याचे सदर अंकातील लेखामध्ये नमूद केले. वक्फच्या ताब्यात असलेल्या जमिनी या त्यांच्या पूर्वजांच्या आणि दान-धर्मातून मिळालेल्या… https://t.co/GExLp80SqY
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 6, 2025
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान स्वीकारून 26 जानेवारी 1950 रोजी भारत प्रजासत्ताक देश झाला. त्याच संविधानाला पहिला विरोध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र ऑर्गनायझरमधूनच झाला. हे संविधान आम्हाला मान्य नाही, असे ऑर्गनायझरने जाहीर केले होते. तीन रंग अशुभ असल्याचे म्हणत याच ऑर्गनायझरने आपल्या तिरंगा ध्वजालाही विरोध केला होता. हा इतिहास विसरता कामा नये.” असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List