राज्यात आरोग्य सेवेतील गट – ‘ड’च्या 680 पदांची सरळसेवेने भरती, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र जारी
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत तसेच आयुर्वेद महाविद्यालय यांच्यासह संलग्न एकूण ९ रुग्णालयातील गट ‘ड’ संवर्गातील 680 पदांची सरळसेवेने भरती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निवड झालेल्या उमेदवारांना आज नियुक्तीपत्र देण्यात आले. नियुक्त झालेल्या सर्व उमेदवारांना मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. रुग्णालयातील रुग्णांना उत्तम सेवा देण्याच्या सूचना यावेळी त्यांनी यावेळी हजर असलेल्या उमेदवारांना दिल्या आहेत.
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात गट -‘ड’ संवर्गातील मंजूर पदांपैकी बऱ्याच वर्षापासून 680 पदे रिक्त होती. रिक्त असलेल्या पदांवर सरळसेवा भरतीची प्रक्रिया तात्काळ सुरु करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती स्थापन झाली होती. या समितीतर्फे पदभरतीची एकत्र प्रक्रिया राबविण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना या समितीचे सदस्य सचिव म्हणून नेमण्यात आले होते.
रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निवड झालेल्या 13 उमेदवारांना प्रातिनिधीक स्वरुपात नियुक्तीचे आदेश देण्यात आले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.राज गजभिये उपस्थित होते.
ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले
जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मेयो, दंत, आयुर्वेद महाविद्यालय आणि सलग्नित रुग्णालयातील गट ‘ड’ संवर्गातील सरळसेवेचे रिक्त पदे भरण्याकरिता मागणीपत्र सामाजिक आणि समांतर आरक्षणासह मागविण्यात आले होते. जिल्ह्यातील नऊ संस्थांकडून 680 रिक्त पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या अर्जामधून 680 उमेदवारांची निवड करण्यात आली.
पदांची आकडेवारी अशी
या पदांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी 66 पदे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालये 344 पदे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि अतिविशेषोउपचार रुग्णालयासाठी 19 पदे, ग्रामीण आरोग्य केंद्र सावनेर 11 पदे, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 57 पदे, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी 135 पदे, शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी 22 पदे, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय 3 पदे तर शासकीय आयुर्वेद रुग्णालयासाठी 23 पदांचा समावेश आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List