डोंगरी बालगृहातील मुलांची ‘हाऊसफुल्ल’कलाकारी, मुलांच्या काल्पनिक व्यावसायिक नाटकाला प्रेक्षकांची पसंती
>>आशिष बनसोडे
प्रत्येक मुलाच्या अंतरंगात दडलेला कलावंत आपल्यातील कलाविष्कार दाखविल्याशिवाय राहत नाही याची प्रचीती डोंगरी बालगृहातील मुलांच्या कलाकारीमुळे येत आहे. गुन्हा केल्यामुळे बालगृहात यावे लागलेली 19 मुले सध्या नाटकाचे थिएटर गाजवत आहेत. काल्पनिक विश्वावर आधारित ‘एक ऐसे गगन के तले’ हे त्यांचे व्यावसायिक नाटक सध्या ‘हाऊसफुल्ल’ शो करत आहे.
गुन्हा घडल्यामुळे मुलांना बालगृहात जाण्याची वेळ येते. अशा मुलांना जबाबदार नागरिक बनविण्याच्या दृष्टीने आवश्यक उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून बालगृहातील 19 मुलांना घेऊन ‘एक ऐसे गगन के तले’ हे काल्पनिक विश्वावर आधारीत व्यावसायिक नाटक बसविण्यात आले आहे. आतापर्यंत या नाटकाचे सहा यशस्वी प्रयोग झाले असून ते सर्वच्या सर्व हाऊसफुल्ल गेले. 8 एप्रिलला जुहूच्या पृथ्वी थिएटर येथे या नाटकाचा शो होणार असून ‘बुक माय शो’वर तो हाऊसफुल्ल झाला आहे. यापूर्वी 2023 साली ‘सेपंड चान्स’ हे 15 मिनिटांचे नाटक बसविण्यात आले होते. तेव्हा मुले उत्तमरीत्या नाटक सादर करू शकतात याची चुणूक आल्याने यावेळी आम्ही 19 मुलांना घेऊन ‘एक ऐसे गगन के तले’ हे व्यावसायिक नाटक बसविले. विशेष म्हणजे, दिग्दर्शकांनी त्या मुलांमध्ये दडलेल्या कलावंताला बाहेर काढण्याचे काम केले. मुलंदेखील मिळालेल्या संधीचे सोने करत आपल्यातील कलाकारीला मोकळी वाट करून देत आहेत. अगदी सहज संवादफेक, नैसर्गिक अदाकारी, अचूक टायमिंग, कुठेही अवघडलेपणा नाही, अशा जबरदस्त आत्मविश्वासाने ही मुलं रंगमंचावर नाटक सादर करीत आहेत. मुख्य म्हणजे, रसिक प्रेक्षकांकडून त्यांना भरभरून दाद मिळत असल्याचे बालगृहाचे अधीक्षक राहुल पंठीकर यांनी सांगितले.
पैसा नसलेल्या विश्वातील जीवन
काल्पनिक विश्वावर हे नाटक आहे. नाटकातील मुलं अशा विश्वात राहतात की, जिथे पैशाला थारा नाही. कुठलाही व्यवहार पैशांविना होतो. तेथे फक्त खा, प्या, आराम करा आणि मनसोक्त आयुष्य जगा यावर आधारित हे नाटक आहे. पैसा नसल्यामुळे चोऱ्या, घरपह्डी, खून अशा घटना घडतच नाहीत असे नाटकात दाखविण्यात येत आहे. नाटकाचे प्रयोग लावल्यावर ‘बुक माय शो’वर त्याची जाहिरात केली जाते. विशेष म्हणजे, रसिकांकडून झटपट तिकीट खरेदी करून नाटक बघायला पसंती दिली जातेय. यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढत असून त्यांना चांगले आयुष्य जगण्याची नवी प्रेरणा यातून मिळत असल्याचे पंठीकर म्हणतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List