कायद्यानुसार कुणाल कामराला…, राज्य सरकारची भूमिका काय? गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा थेट इशारा
कॉमेडियन कुणाल कामरा याच्या एका गाण्यावरून राज्यात एकच खळबळ उडाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील गाण्याने राज्यात गदारोळ उडाला. शिंदे यांनी हा सुपारी घेऊन केलेला प्रकार असल्याचा घणाघात केला. हे विडंबन नाही तर सुपारी घेऊन केलेली बदनामी असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला. या मुद्दावरून विरोधक आणि सत्ताधारी गट आमने-सामने आले. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या घडामोडीवर प्रतिक्रिया दिली आहे.
त्याची मानसिक स्थिती ठीक नसावी
कुणाल कामरा सध्या तामिळनाडूत असल्याचे त्याच्या एका संभाषणातून समोर आले आहे. तर कुणाल कामराबाबत योगेश कदम यांनी मोठे वक्तव्य केले आहे. कुणाल कामरा याने अशा पद्धतीने वारंवार सर्वोच्च पदावर बसलेल्या नेत्यांचा अपमान केला आहे. अशी वक्तव्य त्याने वारंवार केली आहेत. आधी एक गाणं म्हटलं होतं. पुन्हा सरकारची खिल्ली उडवण्यासाठी त्याने गाणं बनवलं आहे. कामराची मानसिक स्थिती ठीक नसावी, असा टोलाही कदम यांनी लगावला.
कदम यांचा कामराला सज्जड इशारा
कोर्टाचा अवमान करून काहीच होणार नाही हा कामराचा भ्रम आहे. कायद्यानुसार त्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल. चौकशीसाठी बोलावलं जाईल, असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी त्याला बजावले. त्याने चौकशीला सहकार्य करण्याचे मान्य केले आहे. त्याने पोलिसांसमोर येऊन त्याची बाजू मांडावी, असे आवाहन कदम यांनी केले.
कायद्यानुसार संरक्षण
दरम्यान योगेश कदम यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. कामरा याने चौकशीला सहकार्य करावे. त्याने पोलिसांसमोर यावे असे आवाहन कदम यांनी केले. तो आरोपी जरी असला तरी पोलिसांनी जी नोटीस दिली आहे, कायद्यानुसार त्याला संरक्षण दिलं जाईल, असे आश्वासन कदम यांनी दिले. तोडफोड जी झाली त्याचं समर्थन आम्ही करत नाही. दोष फक्त शिवसैनिकांना देऊन चालणार नाही. त्यांच्यावर देखील कारवाई झालेली आहे, असे कदम यांनी स्पष्ट केले आहे. आता कामरा कधी पोलिसांसमोर हजर होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List