Sanjay Raut : नाना पटोलेंच्या ऑफरमध्ये सुधीर मुनगंटीवार आहेत का?; संजय राऊत यांचा टोला
धुळवडीला एकमेकांना चिमटे काढणे, टोला हाणणे यात गैर काही मानत नाहीत. धुळवडीला असे उणेदुणे काढल्याने मनातील मळभ तर दूर होतोच, तर आपल्या चुका ही दुखवण्याचा प्रयत्न असतो. धुळवडीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी असाच धमाका केला. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादांना एक मोठी ऑफर दिली. काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन्याच्या या ऑफरने राज्यात चर्चा झडली. अनेकांनी त्यावर मिश्किल प्रतिक्रिया दिल्या. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चिमटा काढला. तर दुसरीकडे प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी काँग्रेस सध्या कुठेय? याचा शोध घेण्याचा टोला नानाभाऊंना हाणला. आता संजय राऊत यांनी सुद्धा त्यावर मिश्किल टिप्पणी केली आहे. त्याची ही चर्चा होत आहे.
मी काय बोलू शकतो वाचा गेली…
या ऑफरवर संजय राऊतांनी खास ठेवणीतील अस्त्र काढले. त्यांच्याकडे याबाबत मोठा साठा संग्रही आहे. त्यांनी ठेवणीतील बाणांनी नव्हे तर पिचकारीने कालच्या धुळवडीवर शिमगा साजरा केला. त्यांच्या खास वाक्यांमुळे अनेकांना खळखळून हसण्याचा आनंद मिळाला.
राऊत म्हणाले, नाना पटोले हे आमचे सहकारी आहेत. राजकारणात काहीही अशक्य नसते.मविआ सरकार येईल असे कोणाला वाटले होते का? राजकारणात सर्व शक्यता आहे. त्यांनी कुणाला ऑफर दिली आहे व कुणी मान्य केली आहे का हे त्यांच्याशी चर्चा करून बघू. राजकारणात रुसवे फुगवे आदळ आपट सुरू आहे .नाना यांनी लवकर भांडे वाजवले, थोडे थांबायला हवे होते, असे राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदेंवर तोंडसुख
एकनाथ शिंदे यांचा भगव्याशी काही संबंध नाही. त्यांचा गट भाजपच्या ताटाखालचे मांजर झाली आहे. त्यांच्या हाती भाजपचा झेंडा आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हातात भाजपचा झेंडा आहे, असा टोला राऊतांनी लगावला. छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा आहे. भगव्या झेंड्याशी त्यांचा काही संबंध नाही. तो उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे, असे ते म्हणाले.
एकनाथ शिंदे काँग्रेसच्या वाटेवर
एकनाथ शिंदे तेव्हा काँग्रेसकडे चालले होते. पृथ्वीराज चव्हाणांना विचारा. अहमद पटेल आता नाहीत. पण दिल्लीत त्यांच्याशी पहाटे चर्चा झाली होती त्यांची. हे सर्वात जास्त मला माहित आहे, असा मोठा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी आज झालेल्या पत्र परिषदेत केला.
ऑफरमध्ये सुधीरभाऊ आहेत का?
नाना पटोले ऑफरबाबत बोलतायत. त्या ऑफरमध्ये मुनंगंटीवार आहेत का ते एकदा चेक करा.नाना पटोलेंच्या ऑफरमध्ये सुधीर मुनगंटीवार आहेत का?, असा टोला संजय राऊत यांनी नाना पटोले यांना लगावला. त्यांनी एकाच बाणात अनेक निशाणे साधले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List