Kunal Kamara : ‘ ही तर सुपारी…’ कॉमेडियन कुणाल कामराच्या त्या गाण्यावर एकनाथ शिंदें यांची पहिली प्रतिक्रिया
राज्यात 2019 नंतर राजकारणाने विसावा न घेता अनेक वळणं घेतली. त्यानंतर इतक्या घडामोडी घडल्या, इतके राजकीय भूकंप घडले की राज्यात कोण कोणत्या पक्षात आहे हेच कळेनासे झाले. त्यानंतर आता कॉमेडियन कुणाल कुमार याने शिवसेना फुटीवर केलेले व्यंगात्मक गाणे वादात सापडले. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वैयक्तिक चिखलफेक केल्याचा आरोप करण्यात आला. त्याने वैयक्तिक आणि बदनामीकारक गाणं म्हटल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी मुंबईत संताप व्यक्त केला. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी त्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
सुपारी घेऊन बदनामी
कुणाल कामरा याचे गाणे म्हणजे एक प्रकारचा स्वैराचार, व्याभिचार असल्याचा घणाघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घातला. कुणाची तरी सुपारी घेऊन त्याने आरोप केले आहेत, असा गंभीर आरोप शिंदे यांनी केला. त्यामुळे मी या वादावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
खरंतर आरोपांवर आपण कधी प्रतिक्रिया देतच नाही, असे शिंदे म्हणाले. गेल्या अडीच वर्षात आरोप सुरूच आहेत. पण आरोपाला मी आरोपानी नाही तर कामातून उत्तर देतो. त्याचे फलित म्हणून जनतेने आम्हाला निवडून दिले. त्यामुळे ज्यांनी आमच्यावर पक्ष चोरला, चिन्ह चोरले असा आरोप करायचे, तर राज्यातील खरा गद्दार कोण असा सवाल करत त्यांनी निवडणुकीत राज्यातील जनतेने आम्हाला बहुमत दिल्याकडे लक्ष वेधले. 80 पैकी 60 जागा आम्हाला मिळाल्या आणि त्यांना 20 च जागा मिळाल्याचे शिंदे म्हणाले.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवेच. विडंबन आम्ही समजू शकतो. अनेक कवी विडंबन करायचे. पण हा एक प्रकारचा स्वैराचार, व्याभिचार आहे. हे सुपारी घेऊन बोलण्याचे काम आहे. पण कुणाल कामरा याने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर टीका केली. हे काही अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, सुपारी घेऊन त्याने हे आरोप केले आहे. त्यामुळे मी त्याच्यावर प्रतिक्रियाच दिली नाही, असे शिंदे म्हणाले. एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कामराला चांगलेच सुनावले. यावेळी त्यांनी हॉटेलच्या तोडफोडची समर्थन करत नसल्याचे म्हटले. पण ही कार्यकर्त्यांची भावना असल्याचे शिंदे म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List