‘शिरसाट यांच्याबद्दल मला…सरकारचा चेहराच उघडा करून टाकला…,’ काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
एक विधेयक येतंय, महाराष्ट्र सुरक्षा कायदा असं काहीतरी बकवास नाव दिलेलं आहे. आता सरकारला महाराष्ट्रातला विद्रोह बंद करून टाकायचा आहे. आमच्याबद्दल कोणी काय बोलायचं नाही, सरकारी योजना विरोधात काही बोलायचं नाही, एखादी गोष्ट जर पटली नाही तर बोलायचं नाही, म्हणजे लोकांनी तोंडाला चिकटपट्ट्या लावून घ्यायच्या आणि व्यक्तच व्हायचं नाही. तुमची एखादी संघटना असेल ती संघटना सरकारला आवडली नाही तर ती बंद, संघटनेत काम करणारे तीन वर्षे आतमध्ये जाणार आहेत. महाराष्ट्र हे तर विद्रोहाचे जन्मस्थान आहे, आपल्या आईने सती जाऊ नये यासाठी पहिला विद्रोह शिवाजी महाराजांनी केला होता. आम्ही लिबरल आहोत, आम्ही नेहरूंचे आणि गांधीजींचे वंशज आहोत, आम्ही अन्यायाविरोधात बोलणारच असे आव्हान राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर दिले आहे.
पण तुम्ही जातीयवादी मानसिकतेचे आहात
राज्य सरकारने ‘महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक २०२४’ हे विधेयक आणले असून त्यावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर धारदार टीका केली आहे. ते पुढे म्हणाले की तुम्हाला महाराष्ट्रातला विद्रोह संपून टाकायचा आहे,म्हणजे संतोष देशमुख मारला गेला, त्याला पोलिसांनी मारला आहे, हे बोलायचं नाही, बोललो तर जितेंद्र आव्हाड जेलमध्ये जाणार. अक्षय शिंदेचा गुन्हा दाखल करा हे परत एकदा कोर्टाने सांगितलं ना? आता मी जर यावर बोललो तर मी जेलमध्ये? वाल्मीक कराड विरोधात आम्ही उघडपणे बोलत होतो आज तो जेलमध्ये आहे. आम्ही जेलमध्ये आहे का? आम्ही मुक्त व्यवस्थेत जगणार, पण तुम्ही जातीयवादी मानसिकतेचे आहात हा माझा खुला आरोप आहे असेही टीकास्र राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सरकारवर टाकले आहे.
संजय शिरसाट यांनी हिंमत दाखवली
आदिवासी मागासवर्गीय निधी कापण्यावरून यांच्या मंत्री संजय शिरसाट यांनी विरोध केला आहे, मी मनापासून संजय शिरसाट यांचे अभिनंदन केलं आहे. शिरसाट हा पहिला माणूस आहे, आजपर्यंतच्या मंत्रिमंडळात अनेक मंत्री बघितले, मागासवर्गीयांचा निधी मुद्दामहून कापला जातो आणि संजय शिरसाट यांनी हिंमत दाखवली आणि विरोध केला, मी उघडपणाने शिरसाट यांच्या बाजूने आहे. संजय शिरसाट यांच्याबद्दल मला प्रचंड आदर निर्माण झाला आहे, त्यांनी या महाराष्ट्र सरकारचा चेहराच उघडा करून टाकला आहे असेही जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.
उच्च न्यायालयाने याची दखल घेतली पाहिजे
संतोष देशमुख निर्घृण हत्याकांडाची केस ज्यांच्याकडे चालू आहे. त्या जजेसनी निलंबित पोलीसांसोबत होळी खेळल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. याबद्दल विचारता ते म्हणाले की न्यायपालिकेतला न्याय देणारा एक माणूस तो या केसशी संबंधित आहे त्या निलंबित पोलीस राजेश पाटील आणि महाजन यांच्याबरोबर होळी खेळतोय,उच्च न्यायालयाने याची दखल घेतली पाहिजे. जजनी सार्वजनिक जीवन आणि या सगळ्या गोष्टींतून अलिप्त राहायला पाहिजे असेही जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.
औरंगजेबाची कबर तुम्हाला काढायची आहे तर…
औरंगजेब कबर तुम्हाला काढायची आहे तर खुशाल काढा, मला याबद्दल आता काही बोलायचं नाही, तुम्हाला काढायची आहे तर काढा, फेकायची असेल तर फेका, ठेवायची असेल तर ठेवा आम्हाला काही बोलायचं नाही. तुम्ही असं म्हणाल हिटलर बाजूला ठेवून दुसरं महायुद्ध सांगा तर हिटलरला बाजूला ठेवून दुसरं महायुद्ध समजून सांगा ? रावणाला बाजूला ठेवून राम समजावून सांगाल ? दुर्योधनाला बाजूला ठेवून महाभारत समजावून सांगाल ? आता हे काही करतील असे जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List