राम मंदिराजळ अमिताभ बच्चन यांनी पुन्हा खरेदी केली जमीन; आहे खास कारण, नेटकऱ्यांकडून तोंडभरून कौतुक
बॉलिवूड सुपरस्टार अन् शहनशाह म्हणजे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन हे नेहमी त्यांच्या ट्वीटमुळे चर्चेत असतात. मात्र आता ते एका वेगळ्या कारणाने चर्चेत आले आहेत ते म्हणजे त्यांनी खरेदी केलेली जमिन.अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहेत. चित्रपट आणि टीव्ही शो व्यतिरिक्त, त्यांच्याकडे उत्पन्नाचे इतर अनेक स्रोत आहेत. त्यांनी अनेक मालमत्तांमध्ये गुंतवणूक केली आहे. अमिताभ यांनी पुन्हा एकदा भगवान श्री रामांच्या शहरात म्हणजेच अयोध्येत जमीन खरेदी केली आहे.
भगवान श्री रामांच्या मंदिराजवळ जमीन खरेदी
2024 मध्येच त्यांनी अयोध्येत 4.54 कोटी रुपयांची जमीन खरेदी केली होती आणि आता पुन्हा एकदा अमिताभ यांनी जमीन खरेदी केली आहे. अमिताभ बच्चन आणि त्यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांच्या नावावर असलेल्या ट्रस्टच्या वतीने राजेश ऋषिकेश यादव यांनी हा करार केल्याचे सांगण्यात येत आहे. ही जमीन तिहुरा मांझा परिसरातील भगवान राम मंदिरापासून 10 किमी अंतरावर आहे, जी 54,454 चौरस फूट क्षेत्रात पसरलेली आहे.
दिवंगत वडील आणि प्रसिद्ध कवी हरिवंश राय बच्चन यांच्यासाठी खरेदी केली जमीन
या जमिनीसाठी 86 लाख रुपये देण्यात आले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ यांनी ही जमीन त्यांची पत्नी किंवा मुलांसाठी नाही तर त्यांचे दिवंगत वडील आणि प्रसिद्ध कवी हरिवंश राय बच्चन यांच्यासाठी खरेदी केली आहे. एका रिपोर्टनुसार बिग बी या जमिनीवर हरिवंश राय बच्चन यांचं स्मारक बांधणार आहेत. पण याबद्दल अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. या जमिनीचा वापर सामाजिक किंवा धार्मिक कार्यासाठी देखील केला जाऊ शकतो अशी माहितीही समोर येत आहे.
वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हरिवंश राय बच्चन मेमोरियल ट्रस्टची स्थापना
अयोध्या येथील मुद्रांक आणि नोंदणी विभागाचे सहाय्यक महानिरीक्षक प्रताप सिंह यांनी “सध्या विक्रीचे काम पूर्ण झाले आहे. स्थानिक विकास प्राधिकरणाकडून इमारत आराखडा मंजूर झाल्यावर, जमीन कोणत्या उद्देशाने खरेदी केली गेली आहे हे कळेल.” असं म्हटलं आहे.अमिताभ बच्चन यांनी 2013 मध्ये त्यांच्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हरिवंश राय बच्चन मेमोरियल ट्रस्टची स्थापना केली. तेव्हा त्यांनी सांगितले होते की हे ट्रस्ट धार्मिक कार्यांसाठी निधी गोळा करण्याचे काम करेल. बिग बींचे वडील एक प्रसिद्ध कवी होते. 18 जानेवारी 2003 रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List