“ही तिच्या कर्माचीच फळं..”; बिपाशा बासूवर का भडकला मिका सिंग?
अभिनेत्री बिपाशा बासूने बॉलिवूडचा एक काळ गाजवला. मात्र गेल्या पाच वर्षांपासून ती चित्रपटांपासून दूर आहे. भूषण पटेल दिग्दर्शित ‘डेंजरस’ या वेब सीरिजमध्ये ती शेवटची झळकली होती. यामध्ये तिचा पती आणि अभिनेता करण सिंग ग्रोवरनेही भूमिका साकारली होती. प्रसिद्ध गायक मिका सिंग या वेब सीरिजचा निर्माता होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मिकाने बिपाशावर जोरदार टीका केली आहे. “तुम्हाला काय वाटतं, त्यांच्या हाती आता काम का नाहीये? देव सर्वकाही पाहतोय”, असं तो ‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला. बिपाशा आणि करणसोबत काम करण्याचा मिकाचा अनुभव अत्यंत वाईट होता, हे या वक्तव्यावरून सहज स्पष्ट होतंय.
“हे पहा, मला करण खूप आवडतो आणि माझं संगीत प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी मी त्या वेब सीरिजमध्ये गुंतवणूक केली. मला अत्यंत कमी बजेटमध्ये काम करायचं होतं. माझा बजेट फक्त चार कोटींचा होता. आम्ही दिग्दर्शक म्हणून भूषण पटेलची निवड केली. त्याने ‘अलोन’ या चित्रपटात बिपाशासोबत काम केलं होतं. विक्रम भट्ट सरांनी कथा लिहावी अशी माझी इच्छा होती. कारण दिग्दर्शक म्हणून मी त्यांची निवड करू शकत नव्हतो. माझा तेवढा बजेटच नव्हता. करण आणि एका नवोदित अभिनेत्रीसोबत आम्हाला या सीरिजमध्ये काम करायचं होतं. पण मधेच बिपाशाने उडी घेतली”, असं मिकाने सांगितलं.
पुढे बिपाशाची तक्रार करत तो म्हणाला, “वेब सीरिजचं शूटिंग लंडनमध्ये पार पडलं आणि बजेट अचानक चार कोटींवरून चौदा कोटींवर गेला. बिपाशा बासूने केलेला ड्रामा पाहून मला प्रॉडक्शनमध्ये पाऊल ठेवल्याचा खूप पश्चात्ताप झाला. करण तिचा पती असूनही तिने किसिंग सीन देण्यास नखरे केले. मी हे करणार नाही, ते करणार नाही.. असा तिचा ड्रामा सुरू झाला. डबिंगच्या वेळी नेमका कोणा ना कोणाचा घसा खराब झालेला असायचा. एकेदिवशी बिपाशाच आजारी पडायची, तर दुसऱ्या दिवशी करण आजारी पडायचा. ज्या अभिनेत्रींच्या हातात काम नाही, त्यांनी संधी देणाऱ्या निर्मात्यांचा आदर केला पाहिजे. काम देणारा व्यक्ती देवतासमान असतो. त्यांना धर्मा प्रॉडक्शन्समध्ये छोटीशी भूमिका पण चालेल, पण तेवढेच पैसे देणाऱ्या नवोदित निर्मात्यांचा ते आदर करणार नाही.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List