राज्यातील भाजपा युती सरकार ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ सारखे टोळ्यांचे सरकार: हर्षवर्धन सपकाळ
राज्यातील भाजपा युती सरकारने आश्वासन देऊनही शेतमालाला भाव दिला नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. लाडक्या बहिणीच्या मतांवर सत्तेत आले पण सत्तेत आल्यानंतर १० लाख बहिणींना लाभापासून वंचित ठेवले आहे. आश्वासन देऊन न पाळणे हे सरकारचे अपयश आहे. भाजपा युती सरकार मस्तीत चालले असून मंत्र्यांमध्ये बेबनाव आहेत, सत्तापिपासू वृत्तीची माणसे सत्तेत आहेत. गँग्ज ऑफ वासेपूर सारखे हे टोळयांचे सरकार असून त्याची किंमत मात्र जनतेला चुकवावी लागत आहे, असा घणाघाती हल्लाबोल प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा युती सरकारवर कडाडून हल्ला केला, ते पुढे म्हणाले की, राज्यात कायदा सुव्यवस्था अत्यंत बिघडलेली आहे. बीड जिल्ह्यात सरपंचाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली, त्यामागे कोण आका होता ते जनतेने पाहिले, आता आकानंतर खोक्या आला आहे. एक मंत्री खोटी कागदपत्रे दिल्याप्रकरणी दोषी ठरला आहे तर सिंधुदुर्गचे पालकमंत्री रोज बेताल वक्तव्य करून राज्यातील शांतता व सौहार्दाला छेद देत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कायदा सुव्यवस्था बिघडली आहे, कोकण व मुंबईचा घनिष्ठ संबंध आहे. कोकणातील मराठी बाणा बिघडवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. कोकणात विपुल प्रमाणात खनिज सापडले आहे ते उद्योगपतींना द्यायचे आहे आणि याप्रकरणी कोकणातील माणूस आडवा येऊ नये म्हणून जाती धर्मात तेढ वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्ताधारी फक्त उद्योगपतींच्या हितासाठी कोकण उद्धवस्थ करू पहात आहे. शक्तीपीठ सुद्धा उद्योगपतींच्या फायद्यासाठीच केला जात आहे. बहुजन समाजातीला लोकांना गोव्याला तीर्थ पिण्यास पाठवायचे आणि उद्योगपतींना आयात निर्यात मोठ्या प्रमाणात करता यावी यासाठी हा शक्तीपीठाचा घाट घातला जात आहे.
देशाच्या व राज्याच्या राजकारणात आघाड्या, युतीची अपरिहार्य आहे, त्याची किंमत काँग्रेसने मोजलेली आहे. युती, आघाडीमुळे कोकणात काँग्रेस निवडणुका लढू शकली नाही. इंडिया आघाडी वा मविआ म्हणून काम करत असताना काही मर्यादा व अडचणी येणे स्वाभाविक आहे. आता कोकणातही पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. सिंधुदुर्गपासून या कामाला सुरुवात झालेली आहे आणि कोकणातही काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी आगामी काळात प्रयत्न केले जाणार आहेत, असेही सपकाळ म्हणाले.
औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतिक..
औरंगजेब हा क्रूर शासक होता, त्याने स्वतःच्या वडिलांना जेलमध्ये टाकले, भावाचा खून केला, लहान भावाला वेडे ठरवले. या क्रूरकर्मा औरंगजेबाला मराठी माणसाने या मातीत गाढले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आम्हाला प्रमाण आहे पण भाजपाला शिवाजी महाराजांचा इतिहास व शौर्य पुसून टाकायचे आहे म्हणून एक प्रवृत्ती औरंगजेबाची कबर उखडून टाका असे सांगत आहे. औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतिक आहे, ते शौर्य पुसून टाकायचे षडयंत्र आहे. औरंगजेबाचे उदात्तिकरण कोणीच करू नये पण भाजपा स्पॉन्सरच त्याचे उदातिकरण करत आहेत असेही सपकाळ म्हणाले.
शिवेंद्रराजे, छत्रपतींचा अपमान का सहन करता?
भाजपा ज्या कुशीत जन्मला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, सावित्रीबाई फुले यांना छळणारा विचारही तोच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर याच विचाराने २०० वर्ष महाराजांची समाधी जनतेला कळू दिली नाही. महात्मा जोतीबा फुलेंनी महाराजांची समाधी शोधून काढली. महाराजांचा विचार व कार्य लोकांना कळू नये हा त्यामागचा डाव होता. भाजपा संविधान मानत नाही ते सरसंघचालक गोलवकर यांचे ‘बंच ऑफ थॉट्स’ मानते, याच पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काय लिहिले आहे, ते शिवेंद्रराजेंनी वाचावे. सावरकरांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काय लिहिले ते वाचावे. भाजपाच्या पिल्लावळी छत्रपती शिवाजीराजे व संभाजीराजे यांचा सातत्याने अपमान करत आहेत. अपमान करा व संरक्षण मिळवा, अपमान करा व पुरस्कार मिळवा हे काम भाजपा करत आहे. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या सोलापूरकर व कोरटकरला संरक्षण दिले जाते त्या सरकारमध्ये शिवेंद्रराजे भोसले आहेत, आपण हा अपमान का सहन करता? असा प्रश्न विचारून महाराजांचा अपमान करणाऱ्या सरकारमधून राजीनामा द्या, असे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते व माजी खासदार हुसेन दलवाई, आमदार भाई जगताप प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, प्रदेश सरचिटणीस रमेश कीर उपस्थित होते.
काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा.
तळकोकणात सामाजिक सौहार्द बिघडवून येथील शांतता नष्ट करण्याचा सत्ताधारी लोकांचा डाव आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात खनिजे सापडली आहेत, ती उद्योगपतींना द्यायची आहेत. कोकणातील माणूस स्वाभिमानी आहे त्याचा अडसर यात येऊ नये म्हणून जातीय व धार्मिक मुद्द्यांवरून वातावरण अशांत करून त्यांना त्यांचा कुटील हेतू साध्य करायचा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेस संघटना मजबूत करण्याची गरज आहे. महिनाभरात स्थानिक लोकांशी चर्चा करुन निर्णय घेतले जातील. आता रडायचे नाही तर लढायचे आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी स्थानिक पातळीवर काम करा, प्रदेश काँग्रेस तुमच्या पाठीशी आहे असे प्रांताध्यक्ष सपकाळ म्हणाले.
यावेळी आमदार भाई जगताप, ज्येष्ठ नेते माजी खासदार हुसेन दलवाई, माजी आमदार हुस्नबानो खलिफे, रमेश कीर, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन गणेश पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List