मोठ्या थकबाकीदारांवर लवकरच जप्तीची कारवाई, अहिल्यानगर मनपा आयुक्त यशवंत डांगे यांचे आदेश
मालमत्ताकरावरील शास्तीमध्ये 100 टक्के सवलत देऊनही अनेक थकबाकीदारांनी कर भरलेला नाही. त्यामुळे सर्व प्रभाग समिती कार्यालयाच्या क्षेत्रातील 2 लाखांपेक्षा अधिक थकबाकी असणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांच्यावर जप्ती कारवाई सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकट्या सावेडी प्रभाग समिती कार्यालयाच्या हद्दीत 138 थकबाकीदारांकडे 10.90 कोटींची थकबाकी आहे. यात शासकीय कार्यालयांकडे 1.89 कोटी रुपये थकीत आहेत. थकबाकीदारांनी तत्काळ कर भरावा; अन्यथा जप्तीची कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.
महानगरपालिकेने करावरील शास्तीमध्ये १०० टक्के सवलत दिली होती. या कालावधीत अपेक्षित वसुली न झाल्याने आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे. पाणी योजनेची वीज बिले व इतर देणी थकीत आहेत. त्यामुळे महापालिकेने वसुलीसाठी कारवाई सुरू केली आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयाच्या हद्दीतील दोन लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या करदात्यांची यादी तयार करण्यात आली आहे. यात शासकीय कार्यालयांचाही समावेश आहे.
सावेडी प्रभाग समिती कार्यालयाच्या हद्दीत दोन लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेले 138 थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे 10.90 कोटींची थकबाकी आहे. यात 18 शासकीय कार्यालये असून, त्यांच्याकडे 1.89 कोटी रुपये थकीत आहेत. सर्व थकबाकीदारांना जप्तीच्या नोटिसा बजावण्याचे आदेश देण्यात आले असून, लवकरच जप्ती कारवाई सुरू केली जाणार आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी तत्काळ थकीत कर भरावा व जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.
सरकारी कार्यालयांकडे 1.89 कोटींची थकबाकी
महाराष्ट्र शासन सामाजिक न्यायभवन समाज कल्याण ऑफिस, राज्य वि. सोसायटी वैद्यकीय प्र. अधिकारी नाशिक, डिस्ट्रीक्ट सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस, तोफखाना पोलीस स्टेशन नगरपरिषद जागा, बी. एम. मंडळ, डिस्ट्रीक्ट सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस, कार्यकारी अभियंता शासकीय विश्रामगृह (भीमा), आयकर विभाग (क्वार्टरस नं. १ ते ३ व ४), जि. प. शाळा भुतकरवाडी प्राथमिक शाळा, जिल्हा बियाणे अधिकारी तालुका बीज गणन केंद्र, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी सावेडी, जिल्हा पोलीस अधीक्षक नगर, नगर तालुका सेतू कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, नगर तालुका तहसील कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तालुका निरीक्षक भूमिअभिलेखा, विशेष भूसंपादन अधिकारी, जिल्हा अधिकारी रो.ह.यो. निवडणूक ऑफिस, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग (सर्कल ऑफिस), सब डिव्हिजन ऑफिसर आरोग्य व बांधकाम, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ बि. लॉ. कॉलनी सावेडी या १८ शासकीय कार्यालयांकडे १.८९ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List