एसटीचा स्वारगेट डेपो गर्दुल्ले, गुंडांचे आगार, पोलीस, एसटी प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष
On
स्वारगेट एसटी आगारात रात्रीच्या सुमारास गुर्दुल्ल्यांसह नशा करणाऱयांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. त्यासोबत मुख्य चौकात रात्रभर सुरू असलेल्या खाद्य पदार्थांच्या गाडय़ांमुळे गुन्हेगारांची ये-जा वाढली आहे. मुख्य म्हणजे आगारापासून पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर आहे. मात्र पोलीस आणि एसटी प्रशासनाला अर्थपूर्ण पाठबळ मिळत असल्यानेच हा परिसर बकाल बनून गेला आहे.
स्वारगेट एसटी स्थानकापासून पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर आहे. मात्र रात्रपाळीला तैनात असलेल्या अधिकारी-कर्मचाऱयांकडून कामात हयगय केली जाते. स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. जुन्या वसुलीभाईच्या अर्थपूर्ण संबंधांमुळे हे स्पा सुरू असल्याची चर्चा होती. या प्रकरणाची माहिती अतिवरिष्ठ अधिकाऱयांना मिळताच त्यांनी संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची सर्वांसमोर खरडपट्टी काढली होती. स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रभर सुरू असलेल्या खाद्य पदार्थ गाड्या, पानटपऱ्या, गुटख्याची विक्री ही याच वसुलीभाईच्या आशीर्वादाने सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पेट्रोलिंगच्या नावाखाली एकाच ठिकाणी गाडी उभी करून आराम करणे, हुल्लडबाजी करणाऱयांना अभय देणे यामुळेच अशा घटना वाढीस लागल्या आहेत, अशी तक्रार नागरिक करत आहेत.
जुन्या बसेस हटविणार – परिवहन मंत्री
या बसेसकडे दुर्लक्ष होत असल्याने त्या अवैध धंद्याचे अड्डे बनल्या आहेत. भविष्यात कोणत्याही बस स्थानक परिसरात अशा प्रकारच्या बसेस उभ्या करण्यात येऊ नयेत, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
सीसीटीव्हीचे उत्तरायण
स्वारगेट एसटी आगारातील सुरक्षेची हमी देणाऱया या सीसीटीव्हीचे तोंड उत्तर दिशेकडे म्हणजे आभाळाकडे वासलेले होते. सीसीटीव्ही योग्य पद्धतीने लावला गेला असता तर मंगळवारच्या दुर्दैवी घटनेचा क्रम टिपण्याकरिता चित्रित झालेले फूटेज महत्त्वाचा पुरावा ठरले असते. परंतु, त्यात केवळ ढग, आणि पक्षीच टिपले गेले होते. अखेर तपासाकरिता पोलिसांना इतर ठिकाणच्या सीसीटीव्ही फूटेजचा आधार घ्यावा लागला.
परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या मतदारसंघातच बलात्कार
परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या पर्वती विधानसभा मतदारसंघांमध्ये स्वारगेट एसटी डेपोच्या आवारात एसटी बसमध्येच बलात्काराची ही घटना घडली. राज्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना सायंकाळपर्यंत माधुरी मिसाळ यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नव्हती. त्या बाहेरगावी गेल्याचे सांगण्यात आले.
येथे दररोज बलात्कार होतोय
स्वारगेट डेपोच्या आतल्या बाजूला मी जाऊन आलोय. तिकडे चार शिवशाही बसेस उभ्या आहेत. चार बसेसचे या लोकांनी लॉजिंग केले आहे. त्यामध्ये कंडोमची पाकिटे पडली आहेत. ब्लेंकेट्स फाटक्या साडय़ा, शर्ट, चादरी अंतर्वस्त्रे आढळली. याचा अर्थ असा होतो की, याच नालायक लोकांकडून सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीत इथे दररोज बलात्कार होत आहेत. – वसंत मोरे, शिवसेना राज्यसंघटक
पुण्याची घटनाही तितकीच गंभीर
सरकार बेफिकीर असल्याने राज्यात महिला सुरक्षित नाहीत. मुंबईत काही महिन्यांपूर्वी शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेने राज्य हादरले होते. त्यातील सत्य बाहेर येऊ नये म्हणून सरकारने आरोपीचा एन्काउंटर करून मुख्य सूत्रधारांना वाचवण्याचाच प्रयत्न केला. विविध विषयांवर बोलणारे मुख्यमंत्री महत्त्वाच्या विषयावर मात्र जाणीवपूर्वक गप्प बसतात. – हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
अतिशय संतापजनक घटना
बस स्थानकाच्या जवळच पोलीस चौकी असून पोलीस कर्मचारी बस स्थानकावर वेळोवेळी गस्त घालत असतात. तरीही अशा पद्धतीचा घृणास्पद गुन्हा करण्याची आरोपीची हिंमत होते, पुण्यातील दररोज गंभीर गुन्हय़ांना आळा घालण्यात गृह खात्याला यश आलेले नाही. खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवावा अशी आमची मागणी आहे. – सुप्रिया सुळे, खासदार
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
27 Feb 2025 08:03:44
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की हे येत्या शुक्रवारी अमेरिकेला भेट देणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी कॅबिनेट बैठक घेतली....
Comment List