डिजिटल अरेस्टच्या धमकीनंतर एफडी मोडली, एक व्हिडीओ कॉल आला अन् वृद्धाच्या खात्यातील 1.94 कोटी लंपास!
बंगळुरूमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अरेस्टची धमकी देऊन त्यांच्याकडून कोटय़वधी रुपये काढून घेण्यात आले. 68 वर्षांच्या या ज्येष्ठाने स्वतःची एफडी मोडून ही रक्कम स्कॅमर्सच्या खात्यावर ट्रान्सफर केली. 30 नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ नागरिकाला एका अनोळखी नंबरवरून व्हॉट्सऍप व्हिडीओ कॉल आला. मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारी असल्याचे काही जणांनी त्यांना सांगितले. ते सगळे पोलीस स्टेशनमधून बोलत असल्याचे दिसत होते. त्यांच्या मागे तसा पोलीस स्टेशनचा सेटअप दिसत होता.
तोतया अधिकाऱ्यांनी ज्येष्ठ नागरिकाला सांगितले की, नरेश गोयलसंबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणात तुमचा सहभाग दिसून आलाय. 247 एटीएम कार्ड जप्त करण्यात आली असून त्यामध्ये तुमचे एक एटीएम कार्ड आढळले आहे. ज्येष्ठ नागरिकाचा मनी लॉण्डरिंग प्रकरणात थेट सहभाग असल्याचा आरोप तोतया अधिकाऱ्यांनी केला. त्यानंतर त्यांना डिजिटल अरेस्ट केली व त्यांचे सर्व बँक डिटेल्स घेतले.
तोतया अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची कुठेही वाच्यता करू नका, असा दम ज्येष्ठ नागरिकाला दिला. कुणाची मदत घेऊ नका, एकटे रहा असे सांगितले. एवढेच नव्हे तर सात दिवसांनी एका बँक खात्यात 1.94 कोटी रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. हा सर्व प्रकार वृद्धाने मुलीला सांगितला. मुलीने तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीची तक्रार दाखल केली.
काय खबरदारी घ्याल
- फसव्या कॉलला बळी पडू नका. कॉलवर बँक डिटेल्स, ओटीपी किंवा पर्सनल माहिती शेअर करू नका.
- पोलीस अधिकारी अशा पद्धतीने ऑनलाईन तपास करत नाहीत किंवा पैसे मागत नाहीत. जर तुम्हाला शंका आल्यास फोन डिसकनेक्ट करा किंवा ब्लॉक करा.
- डिजिटल अरेस्ट हा सायबर फसवणूक किंवा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे. हा प्रकार आपल्या देशात कायद्याने अस्तित्वात नाही. त्यामुळे कुणी डिजिटल अरेस्ट हा शब्द वापरला तर समजून जा की गडबड आहे, हा नक्कीच घोटाळा आहे.
- जरा तुम्हाला स्कॅमचा संशय आला तर बँकेला तत्काळ कळवून टाका. तत्काळ हालचाली केल्या तर तुमचे आर्थिक नुकसान टाळता येईल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List