खाऊगल्ली – आपणही होऊ बच्चे कंपनी

खाऊगल्ली – आपणही होऊ बच्चे कंपनी

>> संजीव साबडे

सध्या चांगली थंडी पडू लागली आहे. काहीतरी गरम, चटपटीत, चमचमीत गरमागरम आणि त्याचबरोबर थंडीला थंडीनेच मारण्यासाठी थंड खाण्याचा हा डिसेंबर महिना. शाळांना म्हणजे मुलांना व शिक्षकांना पुढच्या आठवडय़ात सुटी असेल. त्यांचा आणि त्यांच्याबरोबर आपलाही संध्याकाळी फिरायला जाण्याचा काळ. खरंतर मस्त ठिकाणी फिरायची संधीच. आपल्या बच्चे कंपनीबरोबर मज्जा करण्याची आणि त्यांच्याप्रमाणे वाटेल ते खाण्याचे हेच ते दिवस.

लांब काडीला गुंडाळलेले गुलाबी रंगाचे गोड ‘बुढ्ढी के बाल’ सर्वात शेवटी कधी खाल्ले हे आठवतं का? किंवा रंगीबेरंगी बर्फाचा गोळा कधी चोखून संपवला होता? शाळेसमोरचा बोरं, चिंच, कैरी, बडीशेपचे तुरे, पांढरी चिंच व स्टार फ्रुटच्या कापांवर तिखट मिठाचा शिडकावा करून खाल्ल्याचं आठवतो का? तो ‘चना जोर’ म्हणून ओरडत फिरणारा, शेजारी कांदा-टोमॅटोमध्ये मिसळलेले व चाट मसाला घातलेले उकडलेले चणे, कुल्फीया… असं ओरडत जाणाऱया पांढरी गांधीटोपी घातलेल्या मराठी माणसाने पानावर कापून दिलेली किंवा काठीतली कुल्फी, गंडेरी म्हणजे उसाचे तुकडे आणि उकडलेल्या शेंगा? किंवा आपल्यासमोर भाजून लिंबू, तिखट-मीठ चोळलेलं मक्याचं कणीस, इथून तिथे फिरत राहणारा सुकी भेळवाला, पॉपकॉर्न विकणारा, त्याच्या यंत्रात तडतडणारे मके आणि त्यातून फुलणाऱया लाह्या. उसाचा रस, चहा, शहाळ्याचं गोड पाणी व पातळ खोबरं, हे सर्व आजही आठवतं?

आपण लहान असताना आपल्याभोवती खेळणी दाखवत फिरणारा खेळणीवाला आणि ते मिळावं म्हणून केलेला हट्ट वा रडारड लक्षात आहे. शिवाय तिथे असलेल्या दुकानांमधील भाजीपाव, भेळ, पाणीपुरी, शेव बटाटा पुरी, सँडविच, आईक्रीम व कुल्फी, काला खट्टा आणि वेगवेगळी सरबतं. त्या साऱया आठवणींमुळे भारतातील व मुंबईतीलही पहिली खाऊ गल्ली ती होती, हे लक्षात येईल. सध्या चांगली थंडी पडू लागली आहे. काही तरी गरमागरम, चटपटीत, चमचमीत आणि त्याचबरोबर थंडीला थंडीनेच मारण्यासाठी थंड खाण्याचा हा डिसेंबर महिना. त्यांच्याबरोबर आपलाही संध्याकाळी फिरायला जाण्याचा काळ. खरं तर मस्त ठिकाणी फिरायची संधीच. आपल्या बच्चे कंपनीबरोबर स्वतही बच्चा होऊन मज्जा करण्याची आणि त्यांच्याप्रमाणे वाटेल ते खाण्याचे हेच ते दिवस. आपल्या लहानपणी आपण ज्याप्रमाणे खाण्याच्या जागेचा परिसर, तिथली स्वच्छता आणि तत्सम गोष्टींचा कुठे विचार करायचो? त्यामुळे त्या साऱ्याचा बाऊ करायचा नाही, मुलांचे कपडे खराब झाले, सरबत वा बर्फाच्या गोळ्याचा रंग सांडला तरी दुर्लक्ष करायचं.

आपणही चिंच, सुकी बोरं, कैरी व स्टार फ्रुटचे काप खाऊन शाळेतले वा लहानपणीचे दिवस आठवायचे. स्मरणरंजन म्हणजे हेच. स्वतही लहान होण्याचा व पुनप्रत्ययाचा आनंद या डिसेंबरमध्ये मिळवायचा. फिरून आल्यावर रात्री जेवायचं नाही, कारण जाऊ तिथेच हवं ते खायचं आणि मुलांना, नातवंडांना प्रेमाने खाऊ घालायचं. त्यांच्याबरोबर आपणही बच्चे कंपनी व्हायचं. वाटेल ते खाण्याचं ठिकाण म्हणजे जुहू चौपाटी किंवा गिरगाव चौपाटी. समुद्राच्या किनाऱयावरील वाळूतून फिरताना किंवा तिथे चटई टाकून बसलं की सारे फेरीवाले आपल्याभोवती घोंगावू लागतात. काय खावं आणि काय नको ते कळत नाही. खरं तर आजही बुढ्ढी के बाल, बर्फाचा गोळा, चना जोर, चटपटा चाट, ती सारी छोटी आंबट फळं खावीशी वाटतात. ती तिथे खायची. पूर्वीच्या तुलनेत हे प्रकार महाग झाले असले तरी हौसेला मोल नसतंच.

कपडय़ांना आणि चपला-बुटांना वाळू चिकटली तर चिकटून दे. एक दिवस घरभर झाली, होऊ दे. आजही आपल्या लहानपणीची मजा चौपाटीवर पुन्हा मिळू शकते. ज्यांना लहानपणी आई-वडिलांनी ते प्रकार खाऊ दिले नसतील तर त्यांनी आता त्यांच्यावर ताव मारायचा. प्लेटमध्ये कलिंगड, पपई, अननस, दोन तीन द्राक्ष, केळीचे दोन काप, चिकुची एखादी फोड, सोललेल्या संत्र्याची एखादी फोड आणि त्यावर थोडा चाट मसाला नक्की खा. पुणेरी कुल्फीची मजा पुन्हा एकदा घ्या. चालता चालता उकडलेल्या शेंगा सोलून खा. सफेद इमली आणि बडीशेपेचा तुराही विकत घ्या. आपलं लहानपण पुन्हा एकदा अनुभवा आणि आताच्या लहान मुलांची हौसही पूर्ण करा. त्यांच्या आवडी निवडी वेगळ्या आहेत. त्यांना बर्फाचा गोळा खाताना ग्लास लागतो. तसा गोळा आणि शंभरहून अधिक प्रकारची सरबतं आणि फळांचे ज्यूस, अन्य कोल्ड्रिंक्स चौपाटीच्या सुरुवातीच्या स्टॉलवर मिळतातच. शिवाय जुहू आणि गिरगाव चौपाटीवर वेगवेगळी ब्रँडेड आईक्रीम, मसाला मिल्क व कोल्ड कॉफीही मिळू लागली आहे. मात्र हे थंड प्रकार प्रकृतीनुसार खायचे.

त्याआधी पावभाजी. त्याचे अनेक स्टॉल अगदी समोरच आहेत. मोठय़ा तव्यावर रटरटणारी भाजी, त्यावर पिवळं धमक बटर. त्याच तव्यावर भाजले जाणारे पाव आणि आपल्याला आमंत्रण देणारे त्यांचे लोक. शेजारीच दुसऱया तव्यावरचा तवा पुलावची चव न्यारीच. त्याच्या बाजूलाच फ्राईड राईस, नूडल्स ही चायनीज भावंडं प्लेटमध्ये शिरण्याच्या तयारीत असतात. त्यांचा दरवळणारा वास… मजा वाटते त्या लहान मुलांची आणि बडय़ा लोकांची. ‘भय्या, बच्चो की भाजी पर थोडा चीज डालना हां’ असं सांगणारी आई आणि स्वतसाठी खडा भाजीपाव मागणारा मोठा भाऊ वा वडील.

बाजूच्या स्टॉलवर भेळपुरी, रगडा पॅटिस, शेव बटाटा पुरी, दही वडा आणि पाणीपुरी खाणाऱयांची गर्दी. कोणी ‘भय्या, चटनी कम’ तर कोणी ‘थोडी तिखी बनाओ’ असं सांगतंय. सर्वांनी आपला प्लास्टिकची छोटी वाटी असलेला हात त्या भय्यापुढे केलाय आणि भय्या जणू ‘भर दो झोली’ या सुफी गीताच्या तालावर यंत्रवत एक एक पुरी भरून पुढे सरकवत आहे. पाणीपुरी म्हणजे विंदा करंदीकर यांच्या ‘देणाऱयाने देत जावे, घेणाऱयाने घेत जावे’ कवितेच्या ओळीच. काही जण मसाला पाव खाणारेही असतात. तो असतो भाजी भरलेला पाव. त्याचं सर्वांग बटरने माखलेलं. तो खायचा दाबेलीप्रमाणे. तिथे मराठमोळा वडापाव, आंबट-तिखट-गोड दाबेलीही असते. वडापाव की भाजीपाव की फक्त एकच असं चक्र डोक्यात असताना कोणाला शहाळ्याच्या पाण्याची हुक्की येते. घरी खाण्यासाठी सुकी भेळ आणि ‘हे’ जर आले नसतील तर त्यांच्यासाठी ‘बॉईल्ड चना.’ जाताना इमली, आवळे, स्टार फ्रुट, कैरी या लहानपणीच्या मैत्रिणी… एक वेगळीच मज्जा!

[email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रवि किशन दुधाने आंघोळ करायचे; अजूनही होती एक विचित्र सवय, वैतागून अनुराग कश्यपने ‘गँग्स ऑफ वासेपूर’मधून बाहेरचा रस्ता दाखवला रवि किशन दुधाने आंघोळ करायचे; अजूनही होती एक विचित्र सवय, वैतागून अनुराग कश्यपने ‘गँग्स ऑफ वासेपूर’मधून बाहेरचा रस्ता दाखवला
अनुराग कश्यपची आयकॉनिक फिल्म ‘गैंग्स ऑफ वासेपुर’मध्ये अभिनेता आणि राजकारणी असलेले रवि किशन हे देखील भूमिका करणार होते. मात्र ऐनवेळी...
सलमान खान आणि संगिता बिजलानी याचं लग्न ठरलं होतं, कार्डही छापली होती, पण…
प्रसिद्ध अभिनेत्याच्या मृत्यूनं खळबळ, हॉटेलमध्ये आढळला मृतदेह, चित्रपट सृष्टीवर शोककळा
प्राजक्ता माळी प्रकरणात शिवसेनेनं पहिल्यांदाच भूमिका केली स्पष्ट, सुरेश धस यांना सल्ला काय?
आता ‘नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रा. लि.’, धारावी पुनर्विकास कंपनीला मिळाली नवी ओळख
“हो मी पॅरालायज्ड झालेय? आता जगू द्या आम्हाला”; आलियाचा संताप, मनातील सगळा राग काढला
‘मी गौतमीला कधी कलाकार मानलंच नाही, गौतमी आणि प्राजक्ताची तुलना…’, दिपाली सय्यद काय म्हणाल्या?