भिवंडीत घरावर पेट्रोल ओतून दाम्पत्याला जाळण्याचा प्रयत्न, पूर्ववैमनस्यातून आग लावल्याचा आरोप
पती-पत्नीला जिवंत जाळण्यासाठी घरावर पेट्रोल ओतून घराला आग लावल्याचा प्रकार निजामपुरा परिसरातील कुरेशीनगरमध्ये घडला आहे. या आगीत दोघेही पती-पत्नी जखमी झाले असून त्यांना इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मारेकऱ्यांनी घराला आग लावण्यापूर्वी दरवाजाची कडी बाहेरून लावून घेतली. आग निदर्शनास आल्यानंतर या पती-पत्नीने आरडाओरड केली. त्यामुळे शेजारी मदतीला आल्याने मोठा अनर्थ टळला, अन्यथा घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन या वस्तीत मोठा आगडोंब उसळला असता.
आसिफ कुरेशी आणि फरीन कुरेशी या पती-पत्नीच्या घरावर मारेकऱ्यांनी मध्यरात्री सुमारे साडेतीनच्या सुमारास पेट्रोल टाकून आग लावली. त्यानंतर मारेकऱ्यांनी दरवाजाची बाहेरून कडी लावली आणि ते पळून गेले. आग भडकल्यानंतर घरात धूर जमा झाल्याने झोपेत असलेले दोघे पती- पत्नी जागे झाले. त्या दोघांनी दरवाजाने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा बाहेरून बंद असल्याने दोघांनीही आरडाओरड केली. त्यामुळे शेजारी जागे झाले. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली. या आगीत आसिफ आणि फरीन जखमी झाले. शेजाऱ्यांनी त्यांना इंदिरा गांधी स्मृती शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तीन महिन्यांपूर्वी झाले होते भांडण
तौकीर व त्याच्या साथीदारांनी ही आग लावल्याचा आरोप आसिफ यांनी केला आहे. तीन महिन्यांत पूर्वी तौकीर व त्याच्या साथीदारांनी आसिफ याचा मेव्हणा अनिस व त्याच्या कुटुंबीयांना क्षुल्लक वादातून मारहाण केली होती. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा मागे घे, नाहीतर तुमचे कुटुंब संपवून टाकू अशी धमकी आरोपी यांनी दिली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List