प्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसैन यांची प्रकृती खालावली, अमेरिकेतील रुग्णालयात दाखल
प्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसैन यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिको येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हुसैन यांची प्रकृती गंभीर असल्याचे कळते. हुसैन यांच्या तब्येतीबाबत माहिती मिळताच त्यांचे चाहते सोशल मीडियावर त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.
पत्रकार परवेज आलम यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर झाकीर हुसैन यांचा फोटो शेअर करत त्यांच्या तब्बेतीबाबत माहिती दिली आहे. “तबला वादक, तालवादक, संगीतकार, माजी अभिनेता आणि महान तबलावादक अल्ला राखा यांचे पुत्र उस्ताद झाकीर हुसेन यांची तब्येत बरी नाही. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को रुग्णालयात त्यांच्यावर गंभीर आजारांवर उपचार सुरू आहेत. त्यांचे मेहुणे आयुब औलिया यांनी मला फोनवरून ही माहिती दिली”, असे आलम यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच लंडनमध्ये राहणाऱ्या औलिया साहेबांनी झाकीर यांच्या चाहत्यांना ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केल्याचेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.
संगीत क्षेत्रातील अलौकिक कामगिरीबद्दल झाकीर हुसेन यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण यांसारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. झाकीर हुसैन यांचे भारतासह अनेक देशांमध्ये करोडो चाहते आहेत.
झाकीर हुसैन यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षी तबला वादनाचा सराव सुरू केला. यानंतर वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी तबला वाजवायला सुरवात केली. पुढे वयाच्या 11 व्या वर्षी हुसैन यांनी विविध ठिकाणी आपले तबला वादनाचे कौशल्य दाखवायला सुरवात केली.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ऑल-स्टार ग्लोबल कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केलेले झाकीर हुसैन हे पहिले तबला वादक आहेत. झाकीर हुसैन एक उत्कृष्ट अभिनेते देखील आहेत. त्यांनी 80 च्या दशकातील काही चित्रपटांमध्येही काम केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List