चिंताजनक! पुण्यात वर्षभरात 91 खून, 177 खुनाचे प्रयत्न

चिंताजनक! पुण्यात वर्षभरात 91 खून, 177 खुनाचे प्रयत्न

>> गणेश राख

राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि ‘सेफ सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात खून, खुनाचा प्रयत्न आणि इतर गुन्हेगारीच्या वाढत्या घटना चिंताजनक बनत चालल्या आहेत. यंदा जानेवारी ते डिसेंबर (दि. 26) या कालावधीत 91 खुनाच्या घटना समोर आल्या आहेत. तर, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी 177 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये किरकोळ वाद, पूर्ववैमनस्य

प्रेमप्रकरणासह इतर कारणांतून घडलेल्या घटनांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

‘सेफ सिटी’ म्हणून नावारूपाला येणाऱ्या पुणे शहरात खून, लुटमार, वाहन तोडफोड, जबरी चोरी, दरोडे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची वाढ होत आहे. मागील काही दिवसांत या घटना अधिकच वाढल्या आहेत. धारदार हत्याराने वार, दोन टोळ्यांमधील वाद, वैयक्तिक रागातून खून यांसारख्या घटनांसह वाहन तोडफोडीच्या घटना सामोर आल्या आहेत. नुकतेच हडपसर भागातून भाजप आमदार यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करून खून करण्यात आला. ही घटनाताजी असतानाच, वाघोलीत एका शेतकऱ्याच्या बंगल्यावर गोळीबार केल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही. कोंढवा भागातदेखील अशीच घटना समोर आली असून, गाड्यांची तोडफोड करत हवेत गोळीबार केल्याचा प्रकार घडला. त्यामुळे शहरात पिस्तूलधारी धुमाकूळ घालत असल्याचे समोर आले आहे.

गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच सराईत गुन्हेगारांवर कारवाईचा धडाका लावला आहे. नुकतीच कात्रज भागातील सराईत ‘चुहा गैंग’वर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली. याशिवाय स्थानबद्धता, तडीपारीच्या कारवाया वाढविण्यात आल्या आहेत. तरीदेखील गुन्हेगारी कृत्यांमध्ये घट होत नसल्याचे दिसून येत आहे. जानेवारी ते डिसेंबर (दि २६) शहर परिसरात 91 खुन तर, 177 खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल आहेत. गतवर्षी या कालावधीत 101 खून आणि 244 खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे घडले आहेत. यामध्ये कोयत्याने वार, गोळीबार करून जखमी करण्याचे प्रकार आहेत. यासह घरफोडी, वाहनचोरीच्या घटनांचे प्रमाण देखील मोठे आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List