रोखठोक – मुंबईत मराठी माणसाचे पतन; स्वाभिमानाने जगायची चोरी
विधानसभा निवडणुकांचे निकाल हे मुंबईतून मराठी माणसाचे पतन करणारे आहेत. मुंबईत मराठी बोलता येणार नाही. कारण महाराष्ट्रात आता भाजपचे राज्य आले. त्यामुळे मुंबईत “गुजराती-मारवाडीत बोला’’ असा आग्रह उघड सुरू झाली आहे. मराठी माणसाला यापुढे मुंबईत दहशतीखाली गुलामासारखे जगावे लागेल काय? अशी एकंदरीत परिस्थिती दिसते. 105 हुतात्म्यांचे बलिदान नक्की झाले कशासाठी? देवेंद्र फडणवीस, या प्रश्नाचे उत्तर द्या.
देशाच्या राजधानीत दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साजरे होत आहे व संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते श्री. शरद पवार आहेत. संमेलन दिल्लीत होत असल्याने पंतप्रधान मोदी उद्घाटक असतील हे सांगायची गरज नाही. दिल्लीतून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे पूर्ण पतन सुरू असताना या अशा संमेलनाने काय साध्य होणार? असा प्रश्न पडतो. बेळगाव सध्या कर्नाटकात आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून बेळगाव परिसरातील 20 लाख मराठी बांधव महाराष्ट्रात येण्यासाठी संघर्ष करीत आहेत. महाराष्ट्रात विधानसभेचे व दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू असताना बेळगावात मराठी माणसांचे संमेलन तेथील सरकारने होऊ दिले नाही. मराठी लोकांना अटक करून तुरंगात टाकले. बेळगावचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. मात्र गेल्या 15-20 वर्षांपासून फक्त तारखाच पडत आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना तेथील मराठी माणसांच्या हक्कांवर असे दंडुके चालवणे योग्य नाही. कर्नाटक भारतात आहे व कर्नाटकात वास्तव्यास असलेल्या मराठी माणसांना त्यांचे सण-उत्सव, सभा-संमेलने करण्याचा हक्क भारतीय घटनेने दिला आहे. महाराष्ट्रात उत्तर प्रदेश, बिहारचे लोक त्यांचे कार्यक्रम करतात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रचारास येतात व त्यांचे मराठीद्रोही विचार मांडतात. छठपूजेचे आयोजन होते. कर्नाटक, तामीळनाडूचे राजकीय, सांस्कृतिक उत्सव होतात. ते कोणी अडवत नाही; पण बेळगावातील मराठी माणसांचे सर्व स्वातंत्र्य जबरदस्तीने हिरावून घेतले जाते. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशी घोषणा देणाऱ्यांना गुन्हेगार ठरविले जाते. याचा साधा निषेध करायला महाराष्ट्राचे राज्यकर्ते व साहित्यिक तयार नाहीत.
वैभव नष्ट झाले
मुंबईचे वैभव पोर्तुगीजांनी आपल्या शंभर वर्षांच्या कारकीर्दीत साफ नष्ट केले. 1665 साली हम्फ्री कुक याने मुंबई बेट पोर्तुगीजांकडून आपल्या ताब्यात घेतले त्या वेळी मुंबई ही शिलाहारांची वैभवशाली राजधानी राहिली नव्हती. ते यादवांचे नंदनवन राहिले नव्हते, मुसलमानांनी विध्वंस केलेले, पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेले ते एक दरिद्री बेट होते. महालक्ष्मी निघून गेल्यानंतर अवदसेची मिरास बनलेली अशी ती भूमी झाली होती. मोदी-शहा म्हणजे भाजप राज्यात मुंबईची स्थिती पुन्हा तशीच होताना दिसत आहे. कष्टातून निर्माण केलेली महालक्ष्मी पुन्हा निघून जात आहे की काय! अशी चिंताजनक परिस्थिती काळ्या सावलीप्रमाणे सभोवती दिसत आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा विजय होताच पहिले आक्रमण मराठी भाषेवर झाले व तेही मुंबईत. “मुंबईत आता मराठीत बोलायचे नाही. मराठी चालणार नाही. मारवाडी किंवा गुजरातीत बोला’’ असा येथील दुकानदार दम देऊ लागले. काळबादेवी, मुंबादेवी, पार्ले, मुलुंड, घाटकोपर, ठाणे शहर, मीरा-भाईंदर अशा ठिकाणी या घटना घडल्या. हे लोक आता कल्याण-डोंबिवली, नाशिक, पुणे, नागपूर, जळगावातही पोहोचले. मुंबईवर मराठी माणसाचा हक्क उरलेला नाही हे आता येथील गुजराती-मारवाडी सांगू लागले हे मराठी माणसाचे दुर्दैव म्हणायला हवे. मुंबईतील फलक गुजरातीत लावणे सुरू झाले व “मराठीत पाट्या लिहा, नाहीतर खळखट्याक करू’’ असे आंदोलन करणारे पक्षही मोदी-शहा-फडणवीसांच्या भोजनावळीत सामील झाले. मराठीचा विषय हा आपल्या सगळ्यांचा आहे असे महाराष्ट्रातील राजकारण्यांना वाटत नाही तोपर्यंत हा अन्याय सुरूच राहील. आज चित्र किती भयावह आहे! चंद्रपूरमधील म्युनिसिपालिटी व जिल्हा परिषदेच्या शाळा ‘अदानी’कडे सोपवण्यात आल्या. महाराष्ट्रातील शालेय शिक्षण विभाग या शाळांचे व्यवस्थापन शिक्षण संस्थांकडे देत नाही, तर अदानी फाऊंडेशनला देते व राजकीय लोक कोरडा निषेध करण्यापलीकडे काहीच करीत नाहीत. ‘धारावी’ पुनर्वसन अदानीस नको हे बरोबर. मग मराठी शाळा तरी त्यांच्या गुजराती व्यवस्थापनांकडे का द्यायच्या? मुंबईचेच नव्हे, तर महाराष्ट्राचे अदानीकरण आणि गुजरातीकरण सहजतेने चालू झाले आहे. कालच्या विधानसभा निकालानंतर तर मराठी पूर्णपणे अडगळीत जाईल, अशीच भीती निर्माण झाली आहे.
हाती काय राहिले?
मुंबईत मराठी माणसाकडे नक्की काय राहिले? मुंबईच्या जीवनाच्या कोणत्या एका क्षेत्रात जर महाराष्ट्राची म्हणजेच मराठी माणसाची कामगिरी किमान असेल तर ते क्षेत्र व्यापार-उद्योगाचे. मुंबईतील सार्वजनिक जीवनात इतर सर्व दृष्टींनी श्रेष्ठ दर्जाची कामगिरी बजावणारा महाराष्ट्र मुंबईतील व्यापार-उद्योगांत कमी ठरला म्हणून तो आपल्या घरातच उपरा ठरू पाहत आहे. केवळ या एकाच गोष्टीमुळे मुंबईवरचा महाराष्ट्राचा हक्क नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. महाराष्ट्र हे सर्व आज थंडपणे पाहत आहे. मुंबईतील वृत्तपत्र व्यवसाय मराठी माणसांकडे होता. कोरोनानंतर वृत्तपत्र वाचकांत घट झाली. मराठी नाटक, मराठी सिनेमालाही बरे दिवस नाहीत. सांगलीपासून मुंबईपर्यंत ‘पुष्पा-2’ हा दक्षिणी चित्रपट पाहण्यासाठी तिकीट खिडकीवर झुंबड उडते. काही ठिकाणी ‘पुष्पा-2’च्या तिकिटांसाठी दंगली झाल्या, पण मराठी चित्रपटसृष्टीचे बरे चाललेले नाही. मुंबईतील प्रमुख सरकारी कार्यालये, उद्योग आधीच गुजरातला गेले. हिरे बाजार सुरतला गेला. त्यामुळे महाराष्ट्राचा मोठा महसूलही गुजरातच्या तिजोरीत गेला. हे सर्वच क्षेत्रांत वेगाने चालले आहे. तरीही मराठी राजकारण्यांची साधी पापणी फडफडताना दिसत नाही.
बांधकाम व्यवसाय
मुंबईच्या बांधकाम व्यवसायात गुजरातच्या, हरयाणाच्या श्रीमंतांचा पैसा गुंतला आहे. अदानीपासून हरयाणाच्या सुमीत नरवरपर्यंत सगळे जण मुंबईच्या बांधकाम व्यवसायात आहेत व फडणवीसांचे सरकार त्यांना नियम मोडून मदत करते. या बांधकाम व्यवसायातील मोठा नफा भाजप नेत्यांच्या खिशात जातो. इतरही त्यात हात धुऊन घेतात. त्यामुळे सगळ्यांच्याच तोंडाला चिकटपट्ट्या लागल्यात. गिरगाव, परळ, शिवडी, लालबाग भागांत गुजराती, जैनांचे टॉवर्स उभे राहिले. यातील मतदान महाराष्ट्राच्या विरोधात होत आहे. आश्चर्य असे की, “एक है तो सेफ है’’च्या घोषणा करणाऱ्यांचे हे टॉवर्स. या टॉवर्समध्ये मराठी माणसाला जागा देण्यास त्यांचा विरोध, म्हणजे येथे मराठी माणूस त्यांच्यासाठी हिंदू नसतो. त्यांना मराठी माणसांचा पक्ष घेणारे शिवसेनेसारखे पक्ष नकोत. लोकसभा आणि विधानसभेत हे सर्व टॉवर्स महाराष्ट्राच्या छाताडावर नाचताना दिसले व ‘मराठी नको’ अशी या सर्व टॉवर्सची भूमिका असेल तर मराठी माणसाला एकजुटीने या टॉवर्सशी सामना करावा लागेल.
मराठी कोण?
महाराष्ट्रातील ‘मराठी’ माणूस आज मराठी राहिलेला नाही. कुठे मराठा, कुठे ओबीसी, कुठे तो हिंदू झाला. त्यामुळे मुंबई मराठी माणसाच्या हातून सटकताना दिसते. भाजपच्या व्यापारी वृत्तीने मुंबईचा घास गिळला. त्यामुळे आता फक्त मुंबईचा गुदमरलेला श्वास व तडफड दिसते. आता “मराठी बोलू नका’’ इथून सुरू झालेल्या धमक्या यापुढे “मराठी माणसाने येथून चालते व्हावे’’ इथपर्यंत जातील. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राला काय मिळाले? मुंबईवरचे हक्क गुजराती-मारवाड्यांना सहज दिले.
105 मराठी जनांनी मुंबईसह महाराष्ट्र निर्माण व्हावा म्हणून हौतात्म्य पत्करले.
हुतात्मा स्मारकावरही ‘टॉवर्स’ उभे राहील काय?
twitter – @rautsanjay61
Gmail- [email protected]
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List