शेतातील धान्यलक्ष्मीची पूजा करण्याचा दिवस येळवस; जाणून घ्या प्रथा…
लातूर जिल्हा, धाराशिव जिल्ह्यातील काही भागात आणि जिल्ह्याच्या कर्नाटक सीमावर्ती भागातील काही गावांमध्ये सोमवारी वेळा अमावास्या अर्थात ‘येळवस’ साजरी केली जाते. शेकडो वर्षांची परंपरा असणारा, वन भोजनाचा स्वाद देणारा हा कृषी प्रधान संस्कृतीचा एक महत्त्वाचा सण आहे. शेत शिवार माणसांच्या गर्दीने फुलून जातो तर गाव ओस पडलेले असते. शहरात तर अघोषित संचारबंदी असल्याची जाणीव होते.या सणाचे महत्त्व आणि त्याची माहिती जाणून घेऊ या.
आपल्या संस्कृतीत प्रत्येक सण, उत्सवाला धार्मिक आणि नैसर्गिक अधिष्ठान आहे. अमावस्या सर्व शुभ कार्यांसाठी वर्ज्य समजली जाते. पण काही अमावस्या लक्ष्मीकारक आहेत. तशीच ही लक्ष्मीकारक समजली जाणारी वेळ अमावास्या. शेतातील लक्ष्मीची पूजा या दिवशी केली जाते. आप्तेष्ट, नातेवाईक, मित्र परिवार यांना वन भोजनाचा आस्वाद देणारी ही अमावास्या. खवय्यांसाठी ही एक पर्वणीच म्हटले तर वावगे ठरणार नाही. या दिवशी जेवणाचा मेनू म्हणजे स्वर्गीय सुखाचा आनंदच. वेळ अमावास्येच्या साधारण आठवडाभरापासून यांची तयारी सुरू केली जाते. या दिवशीचा एक – एक पदार्थ म्हणजे भन्नाट आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. एक प्रकारे लातूरचे वैशिष्ट्य असते.
या दिवशी जेवणातील असलेली भाजी इतर कुठेही आणि नंतर कधीही मिळणार नाही. तिला भज्जी म्हटले जाते. बेसनपिठात, आंबवलेल्या ताकामध्ये ती केली जाते. उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या भाज्या उकडून घालून केलेली भज्जी अफलातून. तुरीच्या ओल्या शेंगा, चवळी, भुईमूग, घेवडा, मेथी, लसण पात, कांदा पात, करडी पात यासह सर्व रानमेवा त्यासाठी जमा केला जातो. लसणाची वरून घातलेली फोडणी. लज्जत अधिकच वाढवते.
जेवणातील दुसरा महत्वाचा पदार्थ म्हणजे आंबिल. यांच्यासमोर सर्व पेय फिके पडणार असे याचे वैशिष्ट्य. आंबिल तयार करण्यासाठी चार – पाच दिवस अगोदरच दही लाऊन ठेवलेले असते. एक – दोन दिवस अगोदर त्याचे ताक करून ठेवले जाते. अद्रक, लसण, जीरे यांची दिलेली फोडणी. ज्वारीच्या पिठात बनवलेली ही आंबिल पिऊन झाडाच्या सावलीत घेतलेली एक डुलकी म्हणजे ब्रम्हानंदी टाळीच. यांची चव एवढी भारी असते की कितीही पिले तर समाधानी होत नाही. अधिक आंबील पिल्याने दुसर्या दिवशी अनेकांचे तोंडही सुजवते. आंबील तयार करून ती मातीच्या माठामध्ये भरून पायात चप्पल न घालवता ती डोक्यावर ठेवून शेतात घेऊन जाण्यात येत असते. माठात ठेवलेली असल्याने ती नैसर्गिक थंड झालेली असते. ही थंड आंबील ग्लासावर ग्लास रचवली जाते.
ज्वारी, बाजरीच्या पिठाचे उकडून केलेले उंडे, गव्हाची मणुके, ओले खोबरे आणि अन्य सुका मेवा घालून केलेली खीर ही खरी स्विटी डिश. याशिवाय संबंधित कुटुंबीय आपल्या आवडीप्रमाणे चपाती, पुरणपोळी, ज्वारी ची भाकरी, बाजरीची भाकरी, धपाटे, तिळाची पोळी, तूप, शेंगदाणे चटणी, मिरचीचा ठेचा, असे अनेक पदार्थ असणारी जेवणाची थाळी. चार जणांचे शेतकरी कुटुंबात असले तरी एका शेतामध्ये किमान 20 ते 25 जणांच्या भोजनाची व्यवस्था केलेली असते. घराच्या शेजारी, शेतशिवार शेजारी, मित्र, परिवार, नातेवाईक असा मित्रमेळा घेऊन होणारे वनभोजन म्हणजे वेळ अमावस्या. शेतातील झाडांना बांधलेला झोका लहान थोरांना आनंद देऊन जातो. ज्वारीच्या भेंडीची कोपी करून त्यावर पांघरूण घातले जाते. त्यामध्ये पुजा मांडली जाते. पुजा करून सर्वांना जेवण दिले जाते.
सायंकाळी दगडावर दुध उकळले जाते. ते ज्या प्रमाणे उतू जाते त्याप्रमाणे पुढील वर्षीचा अंदाज बांधला जातो. गावातील मारुतीच्या मंदिरात भोवती कडब्याची पेंढी पेटवून मंदिर प्रदक्षिणा घालून त्याची राख पायदळी तुडवून घरी जातात, अशी प्रथा पण काही गावांमध्ये आढळते. सध्या कडबा उपलब्ध होत नसल्याने ही प्रथा आता लोप पावत चालली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List