Explain : शाहरुख खान, अर्णब गोस्वामींमुळे अल्लू अर्जुनला एका दिवसात मिळाला जामीन
साऊथ सुपरस्टार आणि ‘पुष्पा 2’ चित्रपटाचा नायक अल्लू अर्जुनसाठी आजचा दिवस धक्कादायक आणि अनेक घडामोडींनी भरलेला होता. हा दिवस आयुष्यात अल्लू अर्जुनला नक्कीच काहीतरी शिकवून जाईल. सध्या देशभरात अल्लू अर्जुनला प्रदर्शित झालेला ‘पुष्पा 2’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवीन विक्रम रचत आहे. अवघ्या काही दिवसात ‘पुष्पा 2’ चित्रपटाने तिकीट बारीवर अनेक विक्रम केले आहेत. अल्लू अर्जुनचा हा चित्रपट देश-विदेशात गाजत आहे. पण याच फिल्मशी संबंधित एका घटनेने चित्रपटाच्या यशाला गालबोट लावलं. अल्लू अर्जुनला आज संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीप्रकरणी हैदराबादमधील चिक्कडपल्ली पोलिसांनी अटक केली होती.
‘पुष्पा 2’ चित्रपट थिएटरमध्ये गर्दी खेचत असताना ते पाहण्यासाठी अल्लू अर्जुन हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये आला होता. त्यावेळी एकच गदारोळ गोंधळ झाला. अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुंबड गर्दी केली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. तिच्यासोबत आलेला मुलगा गंभीररित्या जखमी झाला. याच प्रकरणात दाखल झालेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी अल्लू अर्जुन विरोधात गुन्हा नोंदवला व आज त्याला अटक केली.
एकाच दिवसात जामीन कसा मिळू शकतो?
अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. पण त्याला आता अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. न्यायालयीन कठोडी सुनावल्यानंतर अल्लू अर्जुनला एकाच दिवसात जामीन कसा मिळू शकतो? असा अनेकांच्या मनात प्रश्न असेल. सत्र न्यायालयाने अल्लू अर्जुनला ही न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यावर तातडीने सुनावणी घेण्याच्या मागणासाठी अल्लू अर्जुनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
शाहरुखच्या खटल्याच उद्हारण
अल्लू अर्जुनला प्रसिद्ध पत्रकार अर्णब गोस्वामी आणि शाहरुख खान यांच्या प्रकरणाच्या आधारावर अटक झाल्यानंतर त्याच दिवशी जामीन मिळाला. अल्लू अर्जुनच्या वकिलांनी कोर्टात युक्तीवाद करताना शाहरुख खानशी संबंधित एका प्रकरणाचा दाखला दिला. आपला मुद्दा मांडताना अल्लू अर्जुनच्या वकिलांनी शाहरुख खानच्या एका चेंगराचेंगरीच्या केसची आठवण करुन दिली. अल्लूच्या वकिलांनी सांगितलं की, ‘रईस’ चित्रपटाच्या प्रमोशनाच्यावेळी शाहरुखला पहायला जमाव जमलेला. या गर्दीच्या दिशेने शाहरुखने काही टी-शर्ट फेकली होती. त्यामुळे एकच पळापळ झाली. या धावपळीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
एका पत्रकाराच्या केसचा दाखला
शाहरुख विरोधात गुन्ह्याची नोंद झाली. पण गुजरात हाय कोर्ट नंतर सुप्रीम कोर्टाने शाहरुखची निर्दोष सुटका केली. पत्रकार अर्णब गोस्वामीच्या खटल्याच्या आधारावर सुद्धा अल्लू अर्जुन जामिनासाठी पात्र ठरला. त्याला एक दिवसही तुरुंगात ठेवता येणार नाही असं हाय कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List