ठसा – सुप्रिया अय्यर
>> महेश उपदेव
ज्येष्ठ कथाकार आणि कादंबरीकार व अभिव्यक्ती संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया अय्यर यांचे नुकतेच निधन झाले. त्या कर्करोगाने ग्रस्त होत्या आणि त्यांच्यावर जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिटय़ूट येथे उपचार सुरू होते. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ढासळत गेली. अखेर, सोमवारी रात्री उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. विदर्भात सध्या साहित्य क्षेत्राला धक्के बसत आहेत. विदर्भाचे व्यंगचित्रकार मनोहर सप्रे यांचे गेल्या आठवडय़ात निधन झाले होते. त्यानंतर सुप्रियाताईंचे जाणे यामुळे विदर्भातील साहित्य क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.
अय्यर यांनी 12 वर्षांपूर्वी अभिव्यक्ती संस्थेचे अध्यक्ष पद स्वीकारले आणि संस्थेला नावारूपात आणण्यात मोठे योगदान दिले. आपल्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांना लिहिते केले. 2022 मधील साहित्य संमेलनासह त्यांनी नागपुरात विविध साहित्यिक आयोजने यशस्वी केली. अभिव्यक्तीच्या माध्यमातून विविध साहित्यिक उपक्रम त्यांनी सातत्याने राबविले. अय्यर यांच्या ‘शुद्ध वेदनांची गाणी, कन्याकोलम आणि अजन्मा या तीन कादंबऱ्या प्रकाशित झाल्या होत्या. याशिवाय, वऱहाडी भाषेतील त्यांच्या वृत्तपत्रीय लिखाणालाही वाचकांची पसंती लाभली होती. त्यांचे कथाकथनाचे कार्यक्रमही रसिकप्रिय ठरले होते. त्याचप्रमाणे, अय्यर यांनी ललितलेनासह आकाशवाणीसाठी अनेक श्रुतिका, कथा व लेख लिहिले आहेत. मेडिको सोशल वर्कर म्हणून काम केलेल्या अय्यर या राज्य शासनाच्या एड्स नियंत्रण सोसायटीवर अनेक वर्षे कार्यरत होत्या. नागपूरच्या मेयो हॉस्पिटलमध्येही त्यांनी कार्य केले आहे.
त्या राज्य शासनाच्या वाङ्मय पुरस्कार समिती तसेच राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या माजी सदस्या होत्या. अय्यर यांचे खुळी बोगनवेल, सोन्याचे दरवाजे आणि किनखापी मोर हे कथासंग्रह, ‘सनान रे बोंद्रय़ा’ हा वऱ्हाडी कथा संग्रह, ‘चांदणचुरा’ व ‘काही शुभ्र कमळे’ हे ललित लेख संग्रह प्रसिद्ध होते. त्यांच्या ‘खुळी बोगनवेल’, ‘किनखापी मोर’ या कथासंग्रहांना विदर्भ साहित्य संघाचे पुरस्कार मिळाले होते. याशिवाय, अन्य संस्थांचे विविध पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले होते. साहित्य सेवेसोबतच समाज सेवेतही संस्थात्मक कार्य करून आणि त्याला प्रोत्साहन देऊन त्यांनी त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. यादरम्यान मी गेलेच तर वृत्तपत्राला देखणा देहांत तो गगनजुईचा या शीर्षकाखाली बातमी द्यावी असे त्यांनी आधीच सूचित केले होते. सुप्रियाताईंच्या कार्याला सलाम.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List