हरियाणा स्टिलर्स-पाटणा पायरेट्स अंतिम झुंज
अखेरच्या रेडपर्यंत ब्लड प्रेशर वाढविणाऱ्या थरारक उपांत्य लढतीत राहुलने केवळ तीन खेळाडूंच्या साथीने गगन गौडाची अव्वल पकड करत हरियाणा स्टिलर्सने यूपी योद्धाजचे कडवे आव्हान 28-25 असे परतावून लावत 11व्या प्रो कबड्डी लीगच्या फायनलमध्ये धडक दिली. तसेच पाटणा पायरेट्सने दबंग दिल्लीचा 32-28 असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. आता रविवारी जेतेपदासाठी दोन्ही उत्तर हिंदुस्थानी संघ भिडतील. हरियाणा स्टिलर्स संघाने सलग दुसऱ्या वर्षी अंतिम फेरीत प्रवेश केला, हे विशेष
बालेवाडीत सुरू असलेल्या कबड्डी लीगमध्ये आज मराठमोळा चढाईपटू शिवम पठारेने महत्त्वाच्या क्षणी बदललेला गियर आणि उत्तरार्धात केलेल्या अचूक चढाया हरियाणा स्टिलर्ससाठी निर्णायक ठरल्या. उत्तरार्धाच्या सुरुवातीलाच चढवलेला एक लोणही हरियाणासाठी महत्त्वाचा ठरला. अखेरच्या पाच मिनिटांत यूपीच्या गगन गौडाने चांगल्या चढाया केल्या. पण, त्याचीच पकड करत हरियाणाने विजयावर शिक्कामोर्तब केले. यूपीच्या उंचपुऱ्या चढाईपटूंचा अभ्यास करून त्यांना पकडण्यापेक्षा तिसऱ्या चढाईत अडकवण्याचे नाही तर थेट बाहेर फेकून द्यायचे हरियाणाचे नियोजनही जबरदस्त ठरले. यूपीकडून भवानी राजपूत, गगन गौडाबरोबर हितेशचा बचाव संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. शिवमने 7, तर राहुलने बचावात 5 गुणांची कमाई केली.
पूर्वार्धातील वेळ तसा दोन्ही संघांनी एकमेकांची क्षमता ओळखण्यात घालवला असाच खेळ झाला. चढाईपटूंची ताकद लक्षात घेत दोन्ही संघांकडून पूर्वार्धात अधिक करून तिसऱ्या चढाईवरच खेळ झाला. त्यामुळे बचावपटूंचे महत्त्व वाढले. हरियाणाकडून शाडलुईने ही भूमिका पार पाडली, तर यूपीसाठी हितेश खेळत होता. बचाव हीच त्यांची ताकद राहिली होती. हरियाणाकडून शिवमपेक्षा विनयच्या चढाया चोख ठरत होत्या. गगन गौडा आणि भवानी राजपूत यांनी कमालीच्या संयमाने खेळ केला. दोन्हीकडूनच खेळ संथ केल्यामुळे मध्यंतराला हरियाणा संघाला 12-11 अशी एका गुणाची आघाडी मिळवता आली.
उत्तरार्धाची सुरुवात हरियाणाने आक्रमक केली. पहिल्या दोन मिनिटांतच त्यांनी यूपी संघावर लोण चढवून 14-13 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर पुन्हा एकदा तिसऱया चढाईवर भर देत दोघांनी सामना पुन्हा संथ केला. उत्तरार्धातील पहिली दहा मिनिटे संपली तेव्हा हरियाणाने 21-18 अशी आघाडी राखण्यात यश मिळविले होते. चढाईपटू आणि बचावपटू यांच्यातील तीव्र संघर्ष उत्तरार्धाच्या अखेरच्या पाच मिनिटांत बघायला मिळाला. हरियाणाने लोण चढवल्याचा फायदा उचलत सुरक्षित खेळ करून तीन, चार गुणांची आघाडी कायम राखली होती. अखेरच्या तीन मिनिटाला हरियाणाने 25-23 अशा स्थितीतून आघाडी भक्कम करण्याची संधी सोडली. यामध्ये जयदीपच्या बचावातील चुकीचा फटका त्यांना बसला. आघाडी 25-24 अशी कमी झाली, पण पुढच्याच चढाईला विनयने एक गुण वसूल करत आघाडी 26-24 अशी वाढवली. या अखेरच्या तीन मिनिटांत यूपीसाठी गगन गौडाने खोलवर चढाया करून आपल्या उंचीचा फायदा उठवून सामन्यातील रंगत वाढवली. अखेरच्या सेकंदाला मात्र हरियाणाच्या राहुलने तीन खेळाडूंत गगनची अव्वल पकड करत महत्त्वाचे दोन गुण मिळवले आणि हरियाणाच्या अंतिम फेरीवर शिक्कामोर्तब केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List