थोडक्यात: मोदींचा 29 डिसेंबरपासून दिल्ली निवडणूक प्रचार, पंजाबमध्ये बसला भीषण अपघात
पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 डिसेंबर रोजी दिल्ली निवडणुकीसाठी भाजपच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहेत. या आठवडय़ात ते दोन सभांमध्ये सहभागी होणार असून दुसरी सभा 3 जानेवारीला होणार आहे. 29 डिसेंबर रोजी ते रिठाळा येथे नवीन मेट्रो मार्गाची पायाभरणी करणार आहेत. यासोबतच ते देशातील पहिल्या सेमी हाय स्पीड ट्रेन कॉरिडॉरच्या तिसऱया टप्प्याचे उद्घाटनही करणार आहेत. यानंतर ते रोहिणीच्या जपानी पार्कमध्ये जाहीर सभेला संबोधित करतील.
परकीय चलन गंगाजली निचांकी पातळीवर
मुंबई : मंदावलेली अर्थव्यवस्था, डॉलरच्या तुलनेत रुपयाची सातत्याने होणारी घसरण यामुळे देशाची परकीय चलन गंगाजली सात महिन्यातील निचांकी पातळीवर पोहचली आहे. 20 डिसेंबरअखेर सरलेल्या आठवडय़ात या चलन साठय़ामध्ये 8.4 अब्ज डॉलरची घसरण झाली आहे. ऑक्टोबरच्या दुसऱया आठवडय़ापासून रूपयाची घसरण तीव्र झाली आहे. शुक्रवारी एक डॉलरसाठी 85.44 रुपये मोजण्याची वेळ आली. रुपयाची घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेला हस्तक्षेप करावा लागला आहे.
पंजाबमध्ये बसला भीषण अपघात, 8 ठार
भटिंडा : खासगी बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने नाल्यात कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला, तर इतर जखमींवर इस्पितळात उपचार सुरू आहेत. पंजाबमधील भटिंडा येथे ही दुर्घटना घडली. मृतांच्या वारसांना पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख, तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली.
किडझानियात ख्रिसमसचा उत्साह
मुंबई : घाटकोपर येथील किडझानिया इंडिया येथे ख्रिसमसचा अभुतपूर्व उत्साह पहायला मिळत आहे. 21 डिसेंबरपासून किडझानिया मुंबई विंटर वंडरलँडमध्ये परावर्तित झाले असून वैज्ञानिक सफर, कल्पकता आणि गमतीदार ऑक्टिव्हिटींची येथे सांगड घालण्यात आली आहे. बर्फाळ वैज्ञानिक आश्चर्ये आणि कार्यशाळा विंटर वंडरलँडच्या मध्यभागी स्नोई वंडर्स लॅब असेल. 6 जानेवारीपर्यंत किडझानियातील ऑक्टिव्हिटींचा आनंद घेता येणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List