Phule Review: कसा आहे प्रतीक गांधी-पत्रलेखा यांचा ‘फुले’ चित्रपट? कोणत्या कारणांसाठी थिएटरमध्ये पहावा?
विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले.. थोर समाजसुधारक आणि स्त्री शिक्षण पुरस्कर्ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी हा संदेश दिला होता. याच संदेशासोबत ज्योतिबा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांनी मिळून एका अशा क्रांतीची सुरुवात केली, ज्यामुळे आज महिला स्वत:च्या पायावर उभ्या आहेत, स्वावलंबी बनल्या आहेत. त्यांच्याच आयुष्यावर आधारित ‘फुले’ हा चित्रपट बऱ्याच वादानंतर अखेर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. अनंत महादेवन दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता प्रतीक गांधीने ज्योतिबा फुलेंची आणि पत्रलेखाने सावित्रीबाई फुलेंची भूमिका साकारली आहे.
महात्मा ज्योतिबा फुले हे स्वत: आर्थिकदृष्ट्या संपन्न कुटुंबातील होते. स्कॉटिश मिशनरी शाळेत शिक्षण घेणाऱ्या ज्योतिबांना शाळेतून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा समाजात असलेल्या जातिभेदाची जाणीव झाली. शुद्र आहेस म्हणून मित्राच्या घरी असलेल्या लग्न सोहळ्यातून त्यांना बाहेर काढण्यात आलं होतं. ही अन्याय्य वागणूक, समाजातील लोकांच्या आयुष्यात जातीभेदामुळे निर्माण झालेला अंधार दूर करायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, त्यांच्या लक्षात आलं होतं. त्यानंतर ज्योतिबा यांनी पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या साथीने सुरू केलेलं कार्य पुढे कशा पद्धतीने आकाराला आलं, याची मांडणी ‘फुले’ या चित्रपटातून केली आहे.
याआधीही फुलेंच्या आयुष्यावर आधारित ‘सत्यशोधक’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यात अत्यंत छोट्या-छोट्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करून महात्मा फुलेंची कथा पडद्यावर रंगवण्यात आली होती. या चित्रपटाशी तुलना केल्यास अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ या हिंदी चित्रपटात अगदी मोजक्या घटनांची मांडणी करण्यात आली आहे. तरीही प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट दोन कारणांसाठी वेगळा ठरतो. त्यापैकी पहिलं कारण म्हणजे फुलेंच्या आयुष्यावर आधारित चित्रपट पहिल्यांदाच हिंदीत प्रेक्षकांसमोर आला आहे. तर दुसरं कारण म्हणजे यात सावित्रीबाईंचे विचार आणि प्रसंगी त्यांनी स्वत:हून केलेलं नेतृत्त्व यात विशेष अधोरेखित करण्यात आलं आहे. चित्रपटात प्रतीक आणि पत्रलेखा या दोघांनीही चोख भूमिका साकारल्या आहेत. ज्योतिबांच्या वडिलांच्या भूमिकेत झळकलेले विनय पाठकसुद्धा प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडतात.
या चित्रपटात अनंत महादेवन फक्त तथ्यांबद्दल बोलतात. त्यात तुम्हाला कुठेच नाट्य दिसणार नाही. या चित्रपटाची कथा जरी शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरत असली तरी त्यात ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा एकत्रित प्रवास मर्यादित अर्थाने मांडल्याची उणीव जाणवते. हा कोणताही मसालापट नसल्याने यात फक्त दोनच गाणी आहेत. त्यापैकी ‘साथी’ हे गाणं ओठांवर रुळण्याजोगं आहे. हा चित्रपट कोणतंही ज्ञान न देता विचार करायला भाग पाडतो. जिथे मागासवर्गीयांची सावली शाप मानली जाते, त्याच सावलीचा विरोधकांना रोखण्यासाठी शस्त्र म्हणून वापर करून जे दृश्य दाखवण्यात आलं, ते पाहून अंगावर काटा येतो. घरात इंग्रजी शिकणाऱ्या सावित्री आणि फातिमा यांचा प्रोफेशनल एक्सेंट जरासा खटकतो, परंतु अनेक उत्कृष्ट दृश्यांनंतर त्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकतं. त्याचप्रमाणे सेन्सॉर बोर्डाने केलेल्या बदलांचा चित्रपटावर फारसा परिणाम झालेला नाही. कलाकारांचे पोशाख आणि छायांकनही उत्तम झालं आहे.
हा चित्रपट पहावा की पाहू नये?
एका मुलाचा प्लेगने मृत्यू होऊ नये म्हणून त्याला पाठीवर उचलून अनेक किलोमीटर चालणाऱ्या सावित्रीबाई फुलेंचा मृत्यू त्याच प्लेगने होतो. स्त्री-शिक्षण असो, विधवांचा पुनर्विवाह असो, दलितांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवणं असो.. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरु केलेली लढाई आजसुद्धा सुरू आहे. आजच्या घडीला जिथे धर्म आणि जातीच्या नावाखाली एकमेकांशी लढणं खूप सोपं झालं आहे, तिथे क्रांतीची ज्योत तेवत ठेवणं किती आवश्यक आहे, हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट पहायला हवा.
‘फुले’ हा चित्रपट कोणत्याही एका जातीच्या विरोधात नाही. जिथे एकीकडे ब्राह्मण समाजाने फुलेंचा विरोध केला, तिथे दुसरीकडे ब्राह्मण समाजातीलच काही लोकांनी त्यांची अखेरपर्यंत साथ दिली. “आम्ही पाळलेल्या गाईच्या मलमूत्राने घर पवित्र करता, परंतु आमच्या सावलीने घाबरता” असा सवाल विचारण्याची हिंमत ठेवणाऱ्यांवर बनलेला हा चित्रपट प्रेक्षकांनी आवर्जून पहावा असाच आहे.
दिग्दर्शक- अनंत महादेवन
कलाकार- प्रतीक गांधी, पत्रलेखा, विनय पाठक, अक्षया गुरव, आकांक्षा गाडे, अमित बहल, दर्शिल सफारी
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List