सैफवरील चाकूहल्ल्यानंतर आरोपी निवांत करत होता ‘हे’ काम; पोलिसांसमोर केलं कबुल
अभिनेता सैफ अली खानवर या वर्षाच्या सुरुवातीला त्याच्याच राहत्या घरी एका चोराने जीवघेणा हल्ला केला होता. रात्री उशिरा हा चोर सैफच्या घरात शिरला होता. आपल्या मुलांवर वार करेल या भीतीने सैफने त्याच्याशी झटापट केली असता आरोपीने त्याच्यावर चाकूने सहा वार केले. या घटनेनंतर पळालेल्या आरोपीला नंतर मुंबई पोलिसांनी अटक केली. मोहम्मद शरीफुल फकीर असं त्याचं नाव असून तो बांगलादेशचा आहे. मोहम्मदने पोलिसांना दिलेल्या जबाबात ही गोष्ट स्पष्ट केली की त्याने ज्या व्यक्तीवर चाकूने हल्ला केला, तो सुपरस्टार सैफ अली खान असल्याची त्याला किंचितही जाणीव नव्हती.
बांगलादेशी मोहम्मद शरीफुल फकीरने पोलिसांसमोर नोंदवलेल्या जबाबात सांगितलं की त्याने सैफ अली खानला चित्रपटांमध्ये पाहिलं होतं. परंतु रात्रीच्या अंधारात क्लीन शेव लूकमध्ये तो त्याला ओळखू शकला नव्हता. 1600 पानांच्या चार्जशीटमध्ये ही गोष्ट नमूद करण्यात आली आहे की चोरी आणि चाकूहल्ल्याच्या घटनेपूर्वी आरोपीला ते घर सैफचं असल्याची अजिबात माहिती नव्हती.
जबाबानुसार, मोहम्मद शरीफुलने पोलिसांना सांगितलं की जेव्हा त्याने युट्यूबवर हल्ल्याची बातमी पाहिली तेव्हा त्याला समजलं की त्याने सुपरस्टार सैफ अली खानवर हल्ला केला आहे. सैफच्या घरातून पळून गेल्यानंतर शरीफुल मुंबईच्या रस्त्यांवर बिनधास्त फिरत होता. त्याने दादर रेल्वे स्टेशनबाहेरून 50 रुपयांचा इअरफोन विकत घेतला होता. या इअरफोनद्वारे मोबाइलमधील गाणी ऐकून तो स्वत:ला तणावमुक्त ठेवण्याचा प्रयत्न करत होता.
हल्लेखोर मोहम्मद शरीफुल फकीरने पोलिसांना सांगितलं की सैफच्या घरात शिरण्यापूर्वी त्याने इमारतीची चांगली रेकी केली होती. पोलिसांना सैफच्या इमारतीचा सीसीटीव्ही फुटेजसुद्धा मिळाला आहे. ज्यामध्ये 15 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजल्यापासून संध्याकाळी 6.45 वाजेपर्यंत आरोपीला सैफच्या इमारतीबाहेर पाहिलं गेलंय. शरीफुलने केलेल्या चाकूहल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. सैफच्या पाठीतून अडीच इंचाचा चाकूचा तुकडा काढण्यात आला होता. त्यानंतर 21 जानेवारी रोजी त्याला डिस्चार्ज मिळाला होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List