Kolhapur crime news – 32 घरफोडी करणारे तिघे अट्टल चोरटे गजाआड, 61 तोळे सोन्यासह 67 लाखांचा मुद्देमाल जप्त
निर्जनस्थळी असलेल्या बंद घरांना लक्ष्य करून गेल्या चार वर्षांत तब्बल 32 घरफोडी करणाऱ्या तीन अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गजाआड केले त्यांच्याकडून तब्बल 61 तोळे सोन्याचे दागिने व चार किलो चांदी असा एकूण 67 लाख 48 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, शहर पोलीस उपअधीक्षक अजित पिके, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आदी उपस्थित होते.
सलीम महंमद शेख (वय – 37), जावेद मोहम्मद शेख (वय – 30, दोघे रा. रा. गंधारपाले, साहिलनगर, ता. महाड, जि. रायगड), तौफिक मोहम्मद शेख (वय – 30, रा. रुमालेमळा, आर. के. नगर, कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या होत्या. गेल्या चार वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. विशेषतः ग्रामीण भागातील घरफोडींचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी वेगवेगळी पथके नेमून तपास केला असता, खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर सलीम महंमद शेख आणि जावेद महंमद शेख या रायगड जिल्ह्यातील अट्टल घरफोडी करणाऱ्या दोघांसह त्यांचा कोल्हापुरातील साथीदार व सावत्र भाऊ तौफिक शेख या तिघांना शाहूवाडी तालुक्यातील आंबा घाटात सापळा रचून अटक करण्यात आली.
पाच दिवस पोलीस त्यांच्या मागावर होते. अनेक वेळा या सराईत चोरट्यांनी पोलिसांना गुंगारा दिल्यामुळे पोलिसांना वेशांतर करावे लागले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तिघांना ताब्यात घेऊन तपास सुरू केल्याने कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यातील आणखी घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार सागर माने, संजय कुंभार, महेश खोत, लखनसिंह पाटील, महेश पाटील, विजय इंगळे, संदीप बेंद्रे, शुभम संकपाळ, विशाल चौगुले, प्रवीण पाटील, अमित सर्वे, अरविंद पाटील, सागर चौगुले, अमोल कोळेकर, सुरेश पाटील, कृष्णात पिंगळे, सुशील पाटील, राजेंद्र वरंडेकर, राजेश राठोड, रोहित मदनि, यशवंत कुंभार, नामदेव यादव, सायली कुलकर्णी, प्रज्ञा पाटील, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अतिश म्हेत्रे यांनी केली.
सावत्र भाऊ असलेल्या तिघांची सराईत टोळी
जावेद मोहम्मद शेख, सलीम महंमद शेख आणि तौफिक महंमद शेख हे एकमेकांचे सावत्र भाऊ आहेत. सलीम शेख याच्यावर खेड, दापोली, रोहा, माणगाव, पोलादपूर, गोरेगाव या ठिकाणी 12 चोरी आणि घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. तौफिक शेख हा दुचाकीचोरीतील सराईत गुन्हेगार आहे. पोलिसी खाक्या दाखविताच तिन्ही भावांनी मिळून गेल्या चार वर्षांत तब्बल 67 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरल्याची कबुली दिली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List